आदित्य ठाकरे आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 01:38 AM2022-05-13T01:38:21+5:302022-05-13T01:38:49+5:30
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. १३) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
नाशिक : राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. १३) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ब्रह्मगिरीवरील मेटघर गंगाद्वार येथील महादरवाजा पाड्यावरील गावकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे हे सकाळी मुंबई येथून मोटारीने इगतपुरी येथे येणार आहेत. तेथून घोटीजवळील खंबाळा-शिदवाडी शिवारात ते दोन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. पावणेअकरा वाजेच्या सुमारास ते महादरवाजा गावात पोहोचणार असून तेथे ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. या भागात असलेली पाणीटंचाई, वीजपुरवठा आदी विषयांवर चर्चा करत समस्या जाणून घेणार आहेत. दरम्यान, मेटघर गंगाद्वार येथे दुपारी ते पोहोचणार असून गंगाद्वार ते त्र्यंबकेश्वर पायी प्रवास करत गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ते त्र्यंबक-रोहिलेकडे प्रयाण करणार आहेत. मोटारीने वेल्हे येथे प्रयाण करणार असून ते संध्याकाळी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. दरम्यान, ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्र्यंबकेश्वर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.