आदित्य ठाकरेंच्या ब्रॅँडिंगची जबाबदारी खासगी संस्थेवर; पदाधिकाऱ्यांशी खटके
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:07 AM2019-07-21T03:07:03+5:302019-07-21T03:07:58+5:30
स्थानिकांचे पोस्टर्स, बॅनर काढण्यावरून नाशिकमध्ये खडाजंगी
नाशिक : जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबरोबरच त्यांच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली असून, या कंपनीकडूनच ठाकरे यांचे ब्रॅँडिंग केले जात आहे.
कंपनीकडून व्यासपीठाचा ताबा घेण्याबरोबरच पोस्टर्स, बॅनर कसे असावेत याचे अधिकार देण्यात आल्याने शनिवारच्या येथील सभेच्या तयारीच्या निमित्ताने कंपनीचे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडाले.
दौऱ्याचे ब्रँडिंग आमच्याकडे असताना अन्यांची लुडबुड नको
सभास्थळाच्या बाहेर इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पोस्टर्स, बॅनर्स लावून संपूर्ण सभास्थळाची इंच न इंच जागा व्यापून टाकल्याचे पाहून सकाळी ब्रॅँडिंग कंपनीच्या ऑर्गनायझरने सिडकोच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत, तत्काळ पोस्टर्स काढून टाकण्याचे फर्मान सोडले. यातील काही बॅनर तातडीने काढूनही टाकण्यात आले.