विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद : आदित्य ठाकरे यांची ‘डिजिटल शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:56 PM2017-12-20T23:56:47+5:302017-12-21T00:30:50+5:30
आधुनिक शिक्षणपद्धतीकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजिटल शाळा’ भरविली.
नाशिक : आधुनिक शिक्षणपद्धतीकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजिटल शाळा’ भरविली. निमित्त होते, पोलीस वसाहतीमधील मनपा शाळा क्रमांक १६मध्ये साकारलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या शुभारंभाचे! ठाकरे यांनी शाळेला बुधवारी (दि.२०) भेट देऊन क्लासरूमचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी येथील क्लासरूमसोबत जोडलेल्या अन्य महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख नगरसेवक अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांसोबत ठाकरे यांनी हस्तांदोलन करत फोटोसेशन केले. येथील कर्मवीर दादासाहेच फोटो गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रच्या विविध शाळांसह अन्य खासगी शाळांचे विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी सभागृहात हजेरी लावून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ई-मेल, ई-लर्निंग, टॅब, सोशल मीडिया आदींबाबत माहिती सांगितली. त्यानंतर आधुनिक शिक्षणपद्धतीला अनुसरून शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आधुनिक शिक्षणपद्धतीविषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. ई-लर्निंग शिक्षण प्रणाली, डिजिटल अभ्यासाचे फायदे समजावून दिले. या संकेतस्थळामार्फत विद्यार्थी मोफत स्मार्ट आधुनिक शिक्षणपद्धती समजून घेऊ शकतात. मुंबईमध्ये केलेल्या प्रयोगानंतर नाशिकमध्येही या दृष्टिकोनातून प्रयोग करण्याचे युवासेनेने ठरविले आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले. या संकेतस्थळामार्फत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे.
सेल्फी अन् फोटोसेशन
आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी व फ ोटोसेशनचा उत्साह दाखविला. थोरात सभागृहात व्यासपीठावरून त्यांनी विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल झालेल्या सभागृहात सेल्फी घेतली. तसेच मनपा शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन केले. यावेळी मात्र मुलांनी ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गराडा घातल्यामुळे ढकलाढकली होण्याचाही धोका ओढावला होता; मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच अतीउत्साही विद्यार्थ्यांना आवरल्यामुळे अनुचित प्रकार टळला.
विद्यार्थ्यांसोबत आधुनिक शिक्षण पद्धतीबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या मोफत संकेतस्थळाद्वारे ई-लर्निंग अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजून घेता येणार आहे. यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून एक बुस्ट मिळणार आहे.
- आदित्य ठाकरे, अध्यक्ष, युवासेना