खुर्चीवर उभे राहून भाषण करीत आदित्य यांनी घेतले जनआशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:26 AM2019-07-21T01:26:08+5:302019-07-21T01:26:33+5:30
पारंपरिक पद्धतीच्या व्यासपीठीय भाषणाला दूर सारत शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सिडकोत झालेल्या सभेत चक्क खुर्चीवर उभे राहून जनसंवाद साधला आणि आगामी विधानसभेसाठी जनआशीर्वादही मागितले.
नाशिक : पारंपरिक पद्धतीच्या व्यासपीठीय भाषणाला दूर सारत शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सिडकोत झालेल्या सभेत चक्क खुर्चीवर उभे राहून जनसंवाद साधला आणि आगामी विधानसभेसाठी जनआशीर्वादही मागितले.
जळगावहून निघालेल्या शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचे शहरात शनिवारी (दि. २०) आगमन झाले. त्यानिमित्ताने सिडकोतील खुटवडनगर येथे आयोजित विजयी संकल्प सभेत आदित्य ठाकरे यांनी जनसंवादासाठी पारंपरिक पद्धत बाजूला ठेवली. यावेळी त्यांनी नेहमीच्या राजकीय सभेप्रमाणे व्यासपीठावरून मार्गदर्शन न करता थेट उपस्थितांमध्ये खुर्चीवर उभे राहून संवाद साधला. ते म्हणाले, आपली जनआशीर्वाद यात्रा स्वत:ला महाराष्टÑाचा मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार करण्यासाठी नव्हे तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशात हातभार लावला त्यांचे आभार मानण्यासाठी काढली आहे. नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये सेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. नव महाराष्टÑ घडविण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून, त्या निमित्ताने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात, हे पाहण्यासाठी आपण गावोगावी जात आहोत. गेल्या पाच वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली, अशा आंदोलनकर्त्यांचे आभार मानायला आपण यात्रा काढली असून, त्यामुळे लोकसभेत युतीला यश मिळू शकले, असा दावाही ठाकरे यांनी केला.
राजकीय उंची अन्...
महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रिपदी कोण, यावरुन शिवसेना-भाजपामध्ये निवडणुकीपूर्वीच दावेदारी सुरू झाली आहे. त्यात, शिवसेनेकडून थेट ठाकरे घराण्यातील बाळराजे आदित्य यांनाच मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करण्याचे काम सेनानेत्यांनी सुरू केल्याने या पदासाठी राजकारणातील अनुभवाचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना खुर्चीवरच उभे राहून मुख्यमंत्रिपदासाठी आपली राजकीय उंची तर दाखविण्याचा प्रयास केला नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहू नये.
मुख्यमंत्री कोण.. जनता ठरवेल
आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे दोन दिवसांपूर्वी जाहीर करणारे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम मतदारसंघातील आपल्या भाषणात तोच धागा पकडून मार्गदर्शन केले. राज्यात तरुण बेरोजगारांची संख्या वाढली असून, त्यांच्या हाताला काम नाही अशा तरुणांचे प्रश्न व समस्या समजावून घेण्यासाठी आदित्य ठाकरे दौऱ्यावर निघाले असून, या तरुणांचे नेतृत्व ठाकरे यांनी केल्यास महाराष्टÑाचा मुख्यमंत्री कोण होईल हे महाराष्टÑाची जनताच ठरवेल, असे सांगून ‘मुख्यमंत्री भाजपाचाच’ या भाजपा नेत्यांचे वक्तव्य खोडून काढले आहे.