आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:50 AM2022-07-25T10:50:08+5:302022-07-25T10:50:55+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदी पार करण्यासाठी सावरपाडा आणि सेंद्रीपाडा येथील ग्रामस्थांना लाकडाच्या एका खांबावर चालून नदी पार करावी लागत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे बांधण्याचा आलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने आता नव्याने पूल बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. या ठिकाणी तत्काळ नव्याने पूल बांधण्यात यावा, असे आदेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, कामाला सुरुवातही झाली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदी पार करण्यासाठी सावरपाडा आणि सेंद्रीपाडा येथील ग्रामस्थांना लाकडाच्या एका खांबावर चालून नदी पार करावी लागत होती. हे वृत्त तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच युवा सेनेच्या माध्यमातून सावरपाडा येथे नदीपात्रावर लोखंडी पूल उभारण्यात आला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे तास नदीला पूर आल्याने लोखंडी पूल वाहून गेला आणि नागरिकांना पुन्हा तात्पुरती लाकडे टाकून नदी पार करण्याचा मार्ग तयार करावा लागला. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली व जिल्हा प्रशासनाशी लागलीच संपर्क करून नदीवर पुन्हा लोखंडी पूल बांधण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.