आदिवासी कोळी महादेव समाजातर्फे दिंडोरी तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 09:07 PM2018-08-03T21:07:36+5:302018-08-03T21:09:00+5:30
दिंडोरी: आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेतर्फे येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास शार्दूल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शांताराम चारोस्कर, मित्रमेळाचे जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, नगरसेविका आशाताई कराटे, देविदास वटाणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार पटांगण ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत मागण्यांचे नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आले. दिंडोरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था झाली असून त्याकडे लक्ष द्यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गाºहाणे मांडले असता त्यांनी नगरपंचायतीला सदर वास्तूची योग्य देखभाल दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतरही उपाययोजना होत नसल्याने मोर्चा काढण्याची वेळ आली असून सदर वास्तू आदिवासी समाजाच्या सामाजिक संस्थेकडे द्यावी. तसेच शासनाने आदिवासींच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये तसेच शासकीय वसतिगृहात लागू केलेले डीबीटी धोरण बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या .आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवुन सोयी, सुविधा उपलब्ध न करून दिल्यास पुन्हा असेच पाऊल उचलण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले. यावेळी आदिवासी युवकांकडून विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज आंडे, तालुका अध्यक्ष मोहन गांगोडे, भास्कर कराटे,संपत कराटे,तालुका उपाध्यक्ष अंकुश झनकर, भास्कर कराटे, चेतन धुळे, राजेंद्र गांगुडे, राजेंद्र भवर, शंकर गांगोडे, प्रकाश वाघ, सागर चारोस्कर, कृष्णा भगरे, खंडेराव गाढवे, भगवान डंबाळे, चंदू गीते, संपत कराटे, योगिनी सितान, शीतल बोंबले आदींसह दोनशे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. दिंडोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.