स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय
By Admin | Published: February 19, 2015 12:12 AM2015-02-19T00:12:46+5:302015-02-19T00:12:56+5:30
स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय
नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्णातील ग्रामीण भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढून सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या ध्यानी या प्रश्नांचे गांभीर्य आले असून, स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनजागृतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात झाली आहे.
दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागल्याने व वेळीच रुग्णांवर उपचार झाल्याने आरोग्य विभागावर हा प्रश्न सोपवून प्रशासन मोकळे झाले असले तरी, तीन-चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही फोफावलेल्या स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसाआड आरोग्य खात्याची बैठक घेऊन आरोग्य खात्याच्या दैनंदिन उपाययोजनांवर लक्ष ठेवले होते व जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वतंत्र कक्ष करून त्याआधारे माहिती घेण्याचे व तत्काळ मदत पाठविली जात होती. परिणामी स्वाइन फ्लूविषयी जनतेत जागृती होऊन त्याला अटकाव करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे टॉमीफ्लू नामक औषधाची गरज आहे, त्याचप्रमाणे जनजागृतीच्या माध्यमातूनही अटकाव करणे शक्य असल्याची बाब मात्र सध्या जिल्ह्णात कार्यरत असलेल्या आरोग्य व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना अवगत नसल्यामुळेच सहा बळी गेल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे.