सीसीटीव्हीसाठी प्रशासनाचे चाचपडणे सुरूच
By admin | Published: April 15, 2015 10:15 PM2015-04-15T22:15:20+5:302015-04-15T22:15:52+5:30
सीसीटीव्हीसाठी प्रशासनाचे चाचपडणे सुरूच
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीकाळात देशभरातून येणाऱ्या भविकांची सुरक्षा व एकंदरीतच संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत़ याबाबत गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी की भाडेतत्त्वावर या दोन विषयांवर पोलीस प्रशासन आणि सरकार यामध्ये खलबते आणि प्रस्तावाची देवाण-घेवाण सुरू होती़ दरम्यान, निविदाप्रक्रियेचे सोपस्कार आता पूर्ण झाले असून, अवघ्या तीन महिन्यांवर सिंहस्थ येऊन ठेपला असतानाही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही़ त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेसंदर्भात पोलीस अजूनही चाचपड असल्याचे चित्र आहे़
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण १४ जुलै २०१५ रोजी होणार असून, त्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़ भाविकांच्या सुरक्षितता व पोलीस यंत्रणेला गर्दीचे नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीची इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी शहरात सुमारे ३५० सीसीटीव्ही, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे १८० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत़ शहर पोलीस आयुक्तालयाने शहरात तर ग्रामीण पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कोणत्या ठिकाणी बसवावे याचे सर्व्हेक्षण, तसेच जागाही निश्चित केल्या आहेत़
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने बसविण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी सीसीटीव्हीमुळे शहरातील गुन्हेगारीला पायबंद बसेल, असा हेतू यामागे होता़ मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्हीबाबत सांगूनही भाडेतत्त्वावरील सीसीटीव्हीचा घाट पोलीस प्रशासनातर्फे घालण्यात आला़ साहजिकच या दोन वादांमध्ये सीसीटीव्हीच्या प्रक्रियेमध्ये विलंब होत गेला़ अखेर शासनाने सिंहस्थासाठीचा कमी कालावधी लक्षात घेऊन भाडेतत्त्वावरील सीसीटीव्हीला मान्यता दिली़ त्यानुसार शहर पोलिसांना दोन वेळा निविदा काढण्याची वेळ आली़ त्यानंतर शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचे काम विप्रो कंपनीला देण्यात आले़
नाशिक शहरात तपोवनातील साधुग्राम, शाही मिरवणूक मार्ग, गोदावरी नदीपात्र व गर्दीच्या ठिकाणी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये साधुग्राम, शाही मिरवणूक मार्ग, त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थकुंड व गर्दीच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहरातील सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम पोलीस आयुक्तालयात, तर त्र्यंबकेश्वरचे कंट्रोल रूम त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे, रक्षकनगर सीतादेवी येथे तयार करण्यात येत आहे़ शहरातील सीसीटीव्हीचे टेंडर देऊन बारा दिवस उलटले असून, अजूनही या कामास सुरुवात करण्यात आलेली नाही़ त्र्यंबकेश्वरचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे हे काम वेळेत होईल का? याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे़(प्रतिनिधी)