प्रशासन जुने नाशिककरांसोबत : गमे, नांगरे पाटलांचा पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 02:07 PM2020-06-10T14:07:58+5:302020-06-10T14:09:40+5:30
कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला.
नाशिक : शहराचा गावठाण भाग व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकात मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा फैलाव झाल्याने बुधवारी (दि.१०) मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पाहणी करत लोकांशी संवाद साधला. मनपा, पोलीस प्रशासन रहिवाशांसोबत असून जुने नाशिककरांनी जिद्द व स्वयंशिस्तीने कोरोनावर मात करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या भागातील कोरोनाबाधितांची संख्या या आठवडाभरात सुमारे ५०पेक्षा अधिक झाली आहे. तसेच पाच लोकांना कोरोनाने मृत्यूही झाला आहे. यामुळे या भागात नागरिकांना गांभीर्य पटवून देण्यासाठी जुने नाशिक परिसरातील मनपा प्रभाग क्रमांक-१३ मध्ये समाविष्ट असलेला संपुर्ण नाईकवाडीपुरा परिसर महापालिकेकडून सील केला गेला आहे. या भागात कुठल्याही नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच येथील रहिवाशांनाही कोणत्याही कारणासाठी बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. कन्टेंन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या नाईकवाडीपुरा भागात जीवनावश्यक वस्तू अर्थात भाजीपाला, दूध वगैरेंचा पुरवठा करण्याची संपुर्ण तजवीज मनपा प्रशासनाने केली असून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गमे व नांगरे पाटील यांनी केले आहे. यावेळी नाईकवाडीपुरा भागातील अजमेरी मशिद परिसरात नांगरे पाटील यांनी छोटेखानी चौकसभा घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले. कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, डॉ. आवेश पलोड आदि उपस्थित होते. समाविष्ट होणा-या नाईकवाडीपुरा परिसरात भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे, नगरसेवक वत्सला खैरे, गजानन शेलार हे परिसरात फिरून लोकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्यखात्याकडून सुचविलेल्या उपाययोजनांनी अंमलबजावणी करण्याचे आवाहन करत आहेत.
...आता रंगारवाडा शाळेत दवाखाना
नाईकवाडीपुºयाजवळच असलेल्या बुधवार पेठेतील रंगारवाडा मनपा शाळेत आरोग्य विभागाकडून प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे बाह्यरूग्ण तपासणी करून औषधोपचार डॉक्टरांकडून दिला जात आहेत. तसेच नागरिकांची स्क्रिनिंगदेखील केली जात आहे. कोरोना आजाराशी साम्य असलेली तीव्र लक्षणे दिसल्यास संबंधितांना तत्काळ कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सुचना येथील वैद्यकिय पथकाला देण्यात आल्या आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयदेखील जुने नाशिकमध्येच असून या ठिकाणीही कोरोना कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.