महासभेची ध्वनीफीत देण्यास प्रशासनाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:28 AM2017-10-01T00:28:26+5:302017-10-01T00:28:34+5:30
नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफीत शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफीत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात वाजविण्याचे शिवसेनेचे मनसुबे फोल ठरले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपाकडूनच नगरसचिव विभागावर याबाबत दबाव आणला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नाशिक : नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफीत शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफीत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात वाजविण्याचे शिवसेनेचे मनसुबे फोल ठरले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपाकडूनच नगरसचिव विभागावर याबाबत दबाव आणला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बुधवार, दि. २० सप्टेंबरला झालेल्या महापालिकेच्या झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र, सेनेला काउंटर करण्यासाठी लगोलग भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही लक्षवेधी सादर करत शहरात साथरोगाचा प्रभाग गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सात तास चाललेल्या महासभेत शिवसेना प्रशासनावर तुटून पडली असताना भाजपाचे एकेक नगरसेवक प्रशासनातील अधिकाºयांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रशंसोद्गार काढत होते. महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनीफीत संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकवण्याचे शिवसेनेने ठरविले होते. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनीफीतही मागविली होती. मात्र, नगरसचिव विभागाने अशाप्रकारे ध्वनीफीत देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदर ध्वनीफीत ही प्रशासनाच्या कामकाजासाठी असते. त्यामुळे ती अन्य कुणाला देण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही नगरसचिव विभागाने म्हटले आहे. नगरसचिव विभागाने ध्वनीफीत देण्यास नकार दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. मात्र, यामुळे शिवसेनेकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
नगरसचिवांवर भाजपाचा दबाव
महासभेत नागरीहिताविरोधी घेतलेले आपले कर्तृत्व जनतेसमोर येऊ नये यासाठी सत्ताधारी भाजपाने नगरसचिव विभागावर ध्वनीफित देऊ नये यासाठी दबाव आणल्याचा आरोप विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला आहे. नगरसचिव हे महापौरांच्या अधिपत्याखाली काम करत असतात. ध्वनीफित देणार नसेल तर इतिवृत्त तर आमच्या हाती येणारच आहे आणि तो आमचा हक्कही आहे. सदर इतिवृत्तातील ठळक मुद्द्यांचे तसेच वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण यांचे जाहीर फलक संबंधित भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात झळकविले जाणार असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले.