कुंभ मेळ्याबाबत प्रशासन ढिम्म
By admin | Published: January 8, 2015 12:03 AM2015-01-08T00:03:03+5:302015-01-08T00:03:18+5:30
.महंत ग्यानदास महाराज : कावनईतील कपिलधारातीर्थाची पाहणी
घोटी : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळस्थान समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिलधारातीर्थाची आज अखिल भारतीय निर्वाणी, निरोही व दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत ग्यानदास महाराज यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघे काही महिने शिल्लक असताना कुंभमेळा व शाहीस्नानाच्या धार्मिक ठिकाणी प्रशासन ढिम्मपणाचे धोरण अवलंबित असल्याने दाखल होणाऱ्या साधू-महंतासह भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत जोपर्यंत गोदावरी बाबत ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत साधू-महंत शांत बसणार नाही, यासाठी आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. आॅगस्ट महिन्यापासून सिंहस्थ कुंभमेळ्याला आरंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कावनई येथील कपिलधारातीर्थावर शासनाच्या वतीने कोणते नियोजन करण्यात आले याचा आढावा व पाहणी करण्यासाठी आज महंत ग्यानदास महाराज यांनी कपिलधारा-तीर्थाला भेट दिली. दरम्यान, या ठिकाणी शासनाच्या वतीने केवळ वाकी ते कावनई रस्त्याव्यतिरिक्त कोणतेही ठोस काम न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आम्ही संघटित लढा देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या नारायण नागबलीबाबत त्यांनी स्पष्टता देत हा विधी आवश्यक असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
यावेळी कपिलधारातीर्थाचे महंत फलहरी महाराज, उडिया महाराज, राजेंद्र भागवत, सोमनाथ सूर्यवंशी, सुनील चुंबळे आदिंसह संतमहंत व साधू उपस्थित होते.