शहरातील रोगराईच्या विषयावरून प्रशासन लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:53 PM2018-10-17T23:53:23+5:302018-10-18T00:14:06+5:30
शहरात वाढती रोगराई आणि एकाच दिवसात स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची सहाशेवर संख्या आणि महापालिकेची आजारीव्यवस्था याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, येत्या शुक्रवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.
नाशिक : शहरात वाढती रोगराई आणि एकाच दिवसात स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची सहाशेवर संख्या आणि महापालिकेची आजारीव्यवस्था याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, येत्या शुक्रवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. याच महासभेत नगरसेवक निधीतून होत नसलेली कामे तसेच कर्मचाºयांचे सानुग्रह अनुदान या विषयावरदेखील प्रशासनाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. महापालिकेची मासिक महासभा येत्या शुक्रवारी (दि.१९) होणार आहे. प्रशासनाच्या वतीने ग्रीन फिल्ड प्रकरणात सात अधिकाºयांच्या चौकशीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. ग्रीन फिल्ड प्रकरणात महापालिकेने उच्च न्यायालयाची स्थगिती असताना गंगापूररोडवरील बांधकाम पाडल्याने त्याची भरपाई म्हणून १७ लाख रुपयांची भिंत बांधून द्यावी लागली आहे. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव असून त्यावरही जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
शहरात सध्या रोगराईचे वातावरण असून, घरोघर रुग्ण आढळत आहेत. स्वाइन फ्लूमुळे एकाच दिवसात तिघांचा बळी गेला आहे, तर एकाच दिवसात २८ रुग्णदेखील दाखल झाले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, यंदाच्या हंगामात सहाशे रुग्ण संख्या ओलांडली गेली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या उपाययोजना अपुºया पडत आहेत. महापौर रंजना भानसी यांनी सिन्नर फाटा रुग्णालयात भेट दिल्यानंतर तेथील बिकट अवस्था उघड झाली तर शिवसेनेच्या वतीने बिटको, मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ, झाकीर हुसेन कथडा रुग्णालय तसेच सातपूर येथे मायको रुग्णालयांना भेट दिल्यानंतर तेथील दुरवस्था उघड झाली आहे. अनेक ठिकाणी औषधांचा पुरवठादेखील उघड झाला आहे. शहरात रोगराई वाढत असताना दुसरीकडे मात्र प्रशासन रस्त्यावर दिसत नाही, त्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष असून हीच खदखद बाहेर पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते यांनी लक्षवेधी दाखल केली असून, त्यामुळे प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.
अंगणवाडी सेविकांचा प्रश्न गाजणार
महापालिकेतील कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव महासभेने संमत करून प्रशासनाकडे पाठविला होता, परंतु त्यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजीचे वातावरण असून, हा विषयदेखील महासभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. महासभेत निर्णय होऊन अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सुटलेला नसल्याने हा विषयदेखील गाजण्याची शक्यता आहे.
अडचणी येणार
महापालिकेच्या वतीने नगरसेवकांना एकूण अंदाजपत्रकाच्या दोन टक्के नगरसेवक निधी देण्यात आला असून, तो प्रत्येकी बारा लाख इतका आहे. परंतु त्याचा वापर करण्यासाठी नगरसेवकांना दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे काम करता येणार नाही, अशी अडचण आहे. दोन लाख रुपयांमध्ये कोणतेच सलग काम होणे शक्य नसल्याने त्या विषयी संताप असून, गेल्या स्थायीच्या बैठकीत त्याची चुणूकही दिसली होती. नगरसेवक निधीतील कामे होत नसल्याने नगरसेवकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.