तहसील कार्यालयाचा कारभार एकाच छताखाली
By admin | Published: February 2, 2016 10:31 PM2016-02-02T22:31:29+5:302016-02-02T22:32:00+5:30
इगतपुरी : नूतन इमारतीत नवीन वर्षात कामकाजास प्रारंभ
घोटी : दोन वर्षांपूर्वी बांधकाम होऊनही वापराविना पडून राहिलेल्या इगतपुरी येथील नूतन इमारतीत नवीन वर्षाच्या आरंभीच कामकाज सुरू झाले असले, तरी अनेक विभागांची कार्यालये जुन्या इमारतीतच असल्याने शासकीय कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेत अवघ्या पंधरा दिवसात सर्व विभाग नव्या इमारतीत आणले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याने या इमारतीत कारभार सुरू होतो की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती; मात्र जिल्हा महसूल विभागाने या इमारतीत तत्काळ कामकाज सुरू करावे असे आदेश दिल्याने १ जानेवारीपासून नवीन इमारतीत घाईगर्दीत ही कार्यालये स्थलांतरित करण्यात आली होती; मात्र नवीन इमारतीत इंटरनेट, पाणी आदि सुविधा नसल्याने अनेक विभागांचा कारभार जुन्याच इमारतीमधून चालू होता.
दरम्यान, तहसील कार्यालयाचा कारभार दोन ठिकाणी असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दि. १७ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर महसूल विभागाने या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत सर्व विभाग नवीन कार्यालयात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंटरनेट सुविधेसाठी इगतपुरी ते तहसील कार्यालय अशा दोन किलोमीटर अंतराची केबल टाकण्यात आली. यामुळे सर्व विभागांचा कारभार मंगळवारपासून (दि. २) नवीन इमारतीत सुरू करण्यात आल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)