पाच दिवस लागणार प्रशासनाची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:30 AM2019-09-26T01:30:29+5:302019-09-26T01:30:54+5:30
उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आठवडाभराच्या कालावधीत तीन सुट्या येत असल्याने उर्वरित दिवसांवरच सर्व उमेदवारीचा भार पडणार आहे.
नाशिक : उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आठवडाभराच्या कालावधीत तीन सुट्या येत असल्याने उर्वरित दिवसांवरच सर्व उमेदवारीचा भार पडणार आहे. त्यामुळे त्या पाच दिवसांमध्येच प्रशासकीय यंत्रणेला सारी कसरत करावी लागणार आहे.
राज्य विधानसभा निवडणुकी-साठीची अधिसूचना शनिवार, दि. २१ सप्टेंबरपासून जाहीर झाल्याने उमेदवारांचे अर्ज भरण्यास २७ तारखेपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे तो निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा पहिला दिवस असेल. मात्र, दुसऱ्याच दिवशी चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवार येत असल्याने पुढील हे दोन्ही दिवस उमेदवारांना उमेदवारी दाखल करता येणार नाहीत. त्यातही २९ सप्टेंबरला नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अर्थात घटस्थापनेचा दिवस असल्याने मुहूर्ताच्या दृष्टीने हा दिवस चांगला ठरला असता. मात्र, त्या दिवशी रविवार असल्याने हा दिवसदेखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वर्ज्य ठरणार आहे. पुन्हा २ आॅक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने या दिवशीदेखील अर्ज भरता येणार नाहीत. त्यामुळे ३ आणि ४ आॅक्टोबर या दोन दिवसांवरच सर्वाधिक उमेदवारी दाखल होण्याची शक्यता आहे.