खांदेपालटावरून प्रशासनाची गोची, पदाधिकाऱ्यांनी घेतली पुन्हा भेट सीईओंचा अजब सल्ला, नस्ती पाठविली परत
By admin | Published: February 4, 2015 01:34 AM2015-02-04T01:34:01+5:302015-02-04T01:34:28+5:30
खांदेपालटावरून प्रशासनाची गोची, पदाधिकाऱ्यांनी घेतली पुन्हा भेट सीईओंचा अजब सल्ला, नस्ती पाठविली परत
नाशिक : जिल्हा परिषदेतील कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्याअंतर्गत बदल्यांचा मुद्दा तापला असून, काल (दि.३) याप्रकरणी पुन्हा उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अशा बदल्या करता येणार नाही, असा प्रस्ताव बनकर यांच्याकडे आला असता त्यांनी तो सामान्य प्रशासन विभागात परत पाठवून मुख्यालयात एकूण किती काळ हे कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक कार्यरत होते? याची माहिती त्यात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषदेतील कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या सरसकट बदल्या करण्यास प्रशासन अनुकूल नसल्याचे व ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत,अशाच कार्यालयीन अधीक्षक व कक्ष अधिकाऱ्यांच्या विभागात बदल करण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे समजते. विशेष म्हणजे उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी गोपनीय पत्र देऊन याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदल्या करण्याची मागणी करण्यात आल्याने सामान्य प्रशासन विभागाने चक्क या दोन पदाधिकाऱ्यांना अशा बदल्या करता येत नाही, ते नियमात बसत नाही, असे लेखी कळविण्याबाबत केलेली सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंनी धुडकावून लावत मुख्यालयात सेवेत कार्यरत असलेल्या कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांची एकूण सेवा किती झाली आहे, त्याबाबत सेवापुस्तकात नेमकी काय नोंद आहे? यासह विविध माहिती सामान्य प्रशासन विभागाला विचारल्याचे कळते. तसेच मुख्यालयातील खांदेपालटाबाबत प्रशासन ठाम असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले.