ठेकेदाराच्या ‘बनावट’ दाखल्याकडे प्रशासनाची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:12+5:302021-06-24T04:12:12+5:30
माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन विचारणा ...
माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन विचारणा केली आहे. मालेगाव तालुक्यातील गिरणा नदी ते पाटणे हा दोन किलोमीटरचा रस्त्याच्या कामासाठी संजय वाघ या ठेकेदाराने निविदा भरली व त्यासाठी जोडलेल्या कागदपत्रांविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे. निविदा भरताना सिमिलर टाइप ऑफ वर्क केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित असताना वाघ यांनी जिल्हा परिषदेच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्लूडी) केलेल्या कामांचे दाखले चक्क जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीने जोडले आहेत. त्यामुळे सदरचा दाखला बोगस असल्याचा संशय मनीषा पवार यांनी व्यक्त करून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याची जिल्हा परिषदेची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
असाच प्रकार मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ येथील सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याबाबतही घडल्याची तक्रार पवार यांनी केली असून, सदरचे काम ११ लाख, ८४ हजार ३८९ रुपयांचे असताना व सदरचे काम पूर्ण झालेले असताना ठेकेदार वाघ यांनी जिल्हा परिषदेच्या इतर कामांची निविदा भरताना सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याच्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला २३ लाख, ७६ हजार ६७० रुपयांचा तयार करून तो जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षरीनिशी तयार केल्याची तक्रारही मनीषा पवार यांनी केली आहे. सदर ठेकेदाराने जिल्हा परिषदेची अनेक कामे केली असून, ती निकृष्ट दर्जाची असल्याने या कामांची राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेमार्फत मालेगाव तालुक्यातील सर्व कामांची तपासणी करावी व तोपर्यंत वाघ यांची कोणतीही निविदा उघडण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.