रेल्वेस्थानकावरील गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:49+5:302021-04-14T04:13:49+5:30
नाशिक : राज्यात लॉकडाऊन लागू हेाण्याच्या शक्यतेने परप्रांतीय बांधव पुन्हा एकदा गावाकडे परतू लागले असल्याने रेल्वे तसेच बसस्थानकांवर परप्रांतीयांची ...
नाशिक : राज्यात लॉकडाऊन लागू हेाण्याच्या शक्यतेने परप्रांतीय बांधव पुन्हा एकदा गावाकडे परतू लागले असल्याने रेल्वे तसेच बसस्थानकांवर परप्रांतीयांची गर्दी होऊ लागली आहे. विशेषत: नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेर परप्रांतीयांच्या रांगा लागल्या असल्याने मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील वर्षी लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर सर्वाधिक फटका हा परप्रांतीयांना बसला. कारखाने बंद झाल्याने हातचे काम सुटले. बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील परप्रांतीय बांधवांनी गावाकडचा रस्ता धरला होता. सर्वच साधने बंद झाल्यामुळे मजुरांना शेकडो किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागला होता. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता परप्रांतीय बांधव आताच रेल्वे, बस तसेच खासगी प्रवासी साधनांच्या माध्यमातून नाशिक सोडत आहेत.
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दरराेज प्रवाशांची गर्दी होत असून स्थानकाबाहेर त्यांच्या रांगा लागत आहेत. विशेषत: रात्रीच्या सुमारास धावणाऱ्या गाडीने प्रवासी प्रवास करीत असल्यामुळे रात्रीच्या सुमारास स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी होत आहे. रेल्वेस्थानकात गाडी आल्याशिवाय कुणालाही प्लॅटफॉर्मवर परवानगी दिली जात नसल्याने गाडी येईपर्यंत सर्व प्रवासी हे स्थानकाबाहेरील आवारात गाडीची वाट पाहत बसलेले असतात. त्यामध्ये वयोवृद्ध तसेच लहान मुलांचादेखील समावेश असल्याने त्यांची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र सुरक्षिततेचे अंतर तसेच सॅनिटायझर, मास्क याबाबतची कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याने कोरोनाचे प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
--इन्फो--
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने सध्या परप्रांतीयांची ठिकठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. मागील वर्षी परप्रांतीयांच्या रेल्वे प्रवासाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे होती. त्यामुळे किती प्रवासी रवाना झाले. त्यांच्या बसण्यासाठीची व्यवस्था, सुरक्षित अंतर तसेच त्यांना खाण्यापिण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने बघितली होती. यंदा स्थानकाबाहेर होणाऱ्या गर्दीकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसते.
===Photopath===
130421\13nsk_34_13042021_13.jpg
===Caption===
रेल्वेस्थानकावरील गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष