मालेगाव, पिंपळगावसह सहा बाजार समित्यांवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 01:53 AM2022-04-23T01:53:03+5:302022-04-23T01:53:28+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या सहकार सचिवांनी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकांनी नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक तालुका उपनिबंधकांकडे बाजार समित्यांच्या पदभार देण्यात आला आहे. प्रशासकांची नियुक्ती झालेल्या बाजार समित्यांमध्ये पिंपळगाव बसवंत, नांदगाव, चांदवड, कळवण, मालेगाव, सिन्नर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे.
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या सहकार सचिवांनी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकांनी नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक तालुका उपनिबंधकांकडे बाजार समित्यांच्या पदभार देण्यात आला आहे. प्रशासकांची नियुक्ती झालेल्या बाजार समित्यांमध्ये पिंपळगाव बसवंत, नांदगाव, चांदवड, कळवण, मालेगाव, सिन्नर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश असून, जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांवर यापूर्वीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून, एका बाजार समितीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त सहा महिने यांपैकी जो कार्यकाळ कमी असेल, तोपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासकीय राजवट राहणार आहे. सध्या जिल्ह्यात विविध सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात घोंघावत असलेल्या कोरोना संकटामुळे मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली होती. या संदर्भात सहकार विभागाने वेळोवेळी निर्णय घेऊन आदेश पारित केले होते. आता बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग सुकर झाल्यानंतर ग्रामपंचायती आणि सोसायट्यांच्या निवडणुका झाल्याशिवाय बाजार समित्यांच्या निवडणुका घेऊ नयेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. याच आदेशाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दि. २२ एप्रिलनंतर बाजार समित्यांवर निवडणुका पूर्ण होईपर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याच्या सहकार सचिवांनी प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांवर प्रशासकीय राजवट येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश पारित केले असून तालुका उपनिबंधकांकडे प्रशासकीय कारभार देण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत, नांदगाव, चांदवड, कळवण, मालेगाव आणि सिन्नर येथील बाजार समित्यांसंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत चांदवड बाजार समितीचा पदभार प्रशासकांनी स्वीकारला होता. काही ठिकाणी ही प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.