नामको प्रशासकाचा कारभार संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:29 AM2018-09-04T00:29:40+5:302018-09-04T00:30:17+5:30
रिझर्व्ह बॅँकेने नाशिकमधील सर्वात जुन्या नामको बॅँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकाने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत बॅँकेचा व्यवहार संशयास्पद केल्यामुळेच बॅँकेचा एनपीए २८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
नाशिक : रिझर्व्ह बॅँकेने नाशिकमधील सर्वात जुन्या नामको बॅँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकाने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत बॅँकेचा व्यवहार संशयास्पद केल्यामुळेच बॅँकेचा एनपीए २८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. कर्जवाटप तसेच टेंडर प्रक्रियेतील अनियमितता यामुळेदेखील बॅँक आर्थिक संकटात असल्याने या प्रकरणी सनदी लेखापालांची समिती नियुक्त करून प्रशासकाच्या कारभाराची चौकशी करण्याचा ठराव येत्या सर्वसाधारण सभेत केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नामको बॅँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करण्यात आली. ६ जानेवारी २०१४ मध्ये रिझर्व्ह बॅँकेने जे. बी. भोरिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची नियुक्ती का करण्यात आली? प्रशासक नियुक्तीमुळे बॅँकेचे कोणते हित साधले गेले? आणि तत्कालीन संचालक मंडळावर कोणते आरोप होते? बॅँकेचे चार लेखापरीक्षण झाले त्यामध्ये एकही आरोप माजी संचालकांवर ठेवण्यात आलेला नाही याचे उत्तर आजही मिळाले नसल्याचा आरोप हेमंत धात्रक यांनी यावेळी केला. २०१४ पर्यंत अत्यंत सुस्थितीत असलेली बॅँक डबघाईस आली असून, २०१४ मधील ग्रॉन एनपीए २७ कोटी म्हणजे केवळ ३ टक्के असताना आता मात्र ग्रॉस एनपीए २४१ कोटी म्हणजे २८ टक्के झाल्याचे पत्रकार परिषदेप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी हेमंत धात्रक आणि वसंत गिते यांनी बॅँकेवरील अनिर्बंध कारभाराबाबत चिंता व्यक्त करतानाच प्रशासकीय कारभारावर टीका केली. संचालक मंडळ अस्तित्वात असताना ५५ वर्ष सतत बॅँकेने सभासदांना लाभांश दिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून लाभांश देण्यात आलेला नाही. प्रशासकीय कारकिर्दीत झालेली खरेदीदेखील संशयास्पद असून, कोट्यवधींच्या सॉफ्टवेअर खरेदीसाठी कोणतीही निविदा काढण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला. प्रशासकांनी गेल्या १४ एप्रिल रोजी बॅँकेचा नफा ३५ कोटी २१ लाख असा जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र नफा केवळ २५.९५ कोटी इतकाच झाल्याचादेखील आरोप यावेळी करण्यात आला. सुरत व दादर येथील शाखांचा एनपीए १०० टक्के झालेला आहे. दि. २८ मार्च रोजी १० कोटींची गुंतवणूक उत्कर्ष स्मॉल फायनान्स या बॅँकेत केलेली आहे. ती कधीही वसूल होणारी गुंतवणूक नाही. या कारभारामुळे बॅँक अडचणीत असून, या सर्व कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी हेमंत धात्रक, वसंत गिते, विजय साने, सोहनलाल भंडारी, नरेंद्र पवार, अविनाश गोठी, कांतीलाल जैन, भानुदास चौधरी, प्रशांत आव्हाड, प्रफुल्ल संचेती, सुभाष नहार, प्रकाश दायमा, अरुण मुनोत, भगवान खैरनार, शिवदास डागा, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, शिवनाथ कडभाने उपस्थित होते.
माजी संचालकांकडून टीका
नामको बॅँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करण्यात आली. २०१४ पर्यंत अत्यंत सुस्थितीत असलेली बॅँक डबघाईस आली असून, २०१४ मधील ग्रॉन एनपीए २७ कोटी म्हणजे केवळ ३ टक्के असताना आता मात्र ग्रॉस एनपीए २४१ कोटी म्हणजे २८ टक्के झाल्याचे सांगण्यात आले. ४संचालक मंडळ अस्तित्वात असताना ५५ वर्ष सतत बॅँकेने सभासदांना लाभांश दिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून लाभांश देण्यात आलेला नाही.