आजपासून आरटीईअंतर्गत ४५० शाळांमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:24+5:302021-06-11T04:11:24+5:30
नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून ...
नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली जिल्ह्यातील ४५० शाळांमधील आरटीई प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून (दि. ११) पुन्हा सुरू होणार आहे. आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४५४४ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या १३ हजार ३३० विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २०८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना लॉटरीत प्रवेशाची संधी मिळूनही कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा होती. अखेर विद्यार्थ्यांसह पालकांचीही प्रतीक्षा संपुष्टात आली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे ठप्प झालेली प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेला गती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा, असे शिक्षण संचालकांनी म्हटले आहे. दरम्यान, लॉटरीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेेेे.
इन्फो-
जिल्ह्यातील आरटीई प्रवेशप्रक्रियेची स्थिती
जिल्ह्यातील शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४५४४
विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज - १३, ३३०
निवड झालेले विद्यार्थी - ४२०८