मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसमधून प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:56+5:302020-12-25T04:13:56+5:30
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ ...
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ हजार ९७० जागा रिक्त असताना या रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविताना एसईबीसी प्रवर्गातील विद्यर्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे गुरुवारी (दि. २४) डिसेंबर रोजी जाहीर होणारे यादी पुढे ढकलण्यात आली असून विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्य सरकारने बुधवारी (दि. २३) एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा सर्वसाधारण प्रवर्ग निवडण्यासाठी अकरावीच्या ऑनालाइन प्रवेश प्रक्रिया पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र विशेष फेरीचे महाविद्यालय वाटप स्थगित करण्यात आले असून यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु, आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांना २६ डिसेंबरपर्यंत प्रवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना भाग एक भरून लॉक करणे, पडताळणी करून घेणे तसेच पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करून विशेष फेरीसाठी तत्काळ अर्ज करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. त्यानंतर २७ डिसेंबरला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, निवडलेल्या पर्यायांमध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांने ऑनलाइन संमतिपत्र देणे बंधनकारक असल्याची सूचना विभागीय शिक्षण संचालकांनी केली आहे.