गणवेशाविनाच मनपाच्या विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश
By श्याम बागुल | Published: June 12, 2023 04:17 PM2023-06-12T16:17:44+5:302023-06-12T16:17:51+5:30
शासनाकडून निधी मंजूर : २० हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेेश
नाशिक : महापालिकेच्या सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना यंदा दोन गणवेश देण्यात येणार असले तरी, मध्यंतरी राज्य शासनाने सर्वच विद्यार्थ्यांसाठी एकच गणवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न लोंबकळत राहिला.
आता मात्र शासनाने निर्णयात बदल केला असला तरी, शाळा सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाविनाच जावे लागणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सारखाच गणवेश ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ज्या शाळांनी अगोदरच गणवेशाचा निर्णय घेतल्यामुळे व काही शाळांनी गणवेश शिवण्यासाठी देखील टाकल्यामुळे शाळांची अडचण झाली होती. यावरून शासनाच्या निर्णयावर टीका टिप्पणी करण्यात आल्याने शासनाला निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र, तोपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन कालापव्यय झाला. आता शासनाने सुधारित आदेश काढून शाळा पातळीवर शालेय गणवेशाचे रंग निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.