ऑनलाइन गुगल लिंकद्वारे शाळांची प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:22+5:302021-05-30T04:12:22+5:30
बहुतेक शाळांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत गुगल लिंकद्वारे सन २०२१-२२ ची ऑनलाइन प्रवेशप्रकिया सुरूही केली आहे. दरवर्षी ...
बहुतेक शाळांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत गुगल लिंकद्वारे सन २०२१-२२ ची ऑनलाइन प्रवेशप्रकिया सुरूही केली आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात खानेसुमारी आणि विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेचे काम शिक्षण विभागाकडून हाती घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाचा मोठा धोका असल्याने ही प्रक्रिया सद्यस्थितीत ऑफलाइन राबवणे शक्य नाही. ही बाब हेरून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेऊन तशा सूचना केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. सिन्नर गटातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना या आपापल्या शाळेची गुगल लिंक तयार करून प्रवेशप्रक्रिया राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इन्फो
पटसंख्या वाढीवर भर
इयत्ता पहिलीचा पट जास्तीत जास्त वाढेल, तसेच पहिलीसोबत इतर वर्गांचेही प्रवेश लिंकद्वारे उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त पट वाढवावा. पालकांना लिंक देताना आपल्या शाळेची वैशिष्ट्ये पोस्टद्वारे पटवून द्यावी, सर्व केंद्रप्रमुख यांनी आपल्या अधीनस्त शाळांना गुगल लिंक बनवून प्रवेशप्रकिया सुरू करण्याचे सूचित करावे, किती शाळांनी लिंकद्वारे ऑनलाइन प्रवेशप्रकिया सुरू केली, किती प्रवेश झाले त्याचा दैंनदिन अहवाल द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
इन्फो
तंत्रस्नेही शिक्षकांची घ्या मदत
गुगल लिंक निर्मितीबाबत काही अडचणी आल्यास किंवा लिंक कशी तयार करावी, याबाबत गटातील तसेच आपल्या केंद्रातील कोणत्याही तंत्रस्नेही शिक्षकाची मदत घेऊन आपल्या शाळेची लिंक तयार करून घ्यावी. चालू वर्षी पहिलीचा वर्ग ज्या वर्गशिक्षकांकडे आहे, त्यांनी जाणीवपूर्वक पट वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्याध्यापकांनी त्यावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचनाही गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.