लसीकरणानंतर अँटिबॉडीज तपासणी करण्याकडे तरुणाईचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:44+5:302021-07-20T04:11:44+5:30
नाशिक : कोरोनाच्या विरोधातील लसीकरण करण्यासाठीची मुभा मिळाल्यापासून १८ वर्षांवरील तरुणाईने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. त्यातही तरुणाई लसीकरण ...
नाशिक : कोरोनाच्या विरोधातील लसीकरण करण्यासाठीची मुभा मिळाल्यापासून १८ वर्षांवरील तरुणाईने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. त्यातही तरुणाई लसीकरण आणि प्रतिकारशक्तीबाबत अन्य वयातील घटकांपेक्षा अधिक जागरूक असल्याने लसीकरणानंतर आपल्यात किती अँटिबॉडीज निर्माण झाल्या, त्याची तपासणी करून घेण्याकडेदेखील नागरिकांचा कल वाढला आहे.
कोरोनाच्या दहशतीत मागील संपूर्ण वर्षभरापेक्षा अधिक काळ गेल्यानंतर जानेवारी महिन्यात लसीकरणाला प्रारंभ झाला होता. मात्र, प्रारंभीच्या टप्प्यातील लसीकरण हे केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यानंतर कोरोनायोद्ध्यांसाठी तर त्यानंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्ण असणाऱ्या मध्यमवयीनांना प्राधान्य देण्यात आले होते. अखेरच्या टप्प्यात दोन महिन्यांपूर्वी १८ वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात तरुणांकडून लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. मात्र, त्यानंतर केवळ लस घेण्यापेक्षा लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज कितपत वाढल्या त्याची तपासणी करून खरेच प्रमाण वाढले की नाही, त्याची खातरजमा करून घेण्याकडेदेखील कल वाढला.
इन्फो
डेल्टा प्लसमुळेदेखील वाढ
म्युटेशनद्वारे तयार झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना अधिक पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या नवीन विषाणूला ‘डेल्टा प्लस’ असे संबोधले जात आहे. हा व्हेरिएंट घातक समजला जात आहे. कारण लसीमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीज आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरविण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेदेखील अँटिबॉडीज कितपत आहेत किंवा नाही त्याची चाचणी करून घेतली जात आहे.
इन्फो
शासकीय लॅबमध्ये नाही सुविधा
शासकीय यंत्रणा ही कोरोनावरील उपचार आणि लसीकरणाच्या प्रक्रियेतच अजूनही अडकून पडली आहे. तसेच अँटिबॉडीज तपासण्यासाठीच्या सोयी-सुविधांची पूर्तताच जिल्हा रुग्णालयासह अन्य कोणत्याही शासकीय किंवा मनपा रुग्णालय किंवा लॅबमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या कुणाला अँटिबॉडीजची चाचणी करायची असते, त्यांना खासगी लॅबवरच जावे लागते.
इन्फो
दररोज ३५ हून अधिक तपासण्या
शहरातील काही मोजक्याच खासगी लॅबमध्ये ही अँटिबॉडीजची तपासणी होते. या सर्व लॅबमध्ये मिळून गत दीड महिन्यापासून साधारणपणे ३० ते ३५ अँटिबॉडीज चाचणी करून घेतली जात आहे. त्यातदेखील सुमारे पंचवीसहून अधिक युवक - युवतींचाच समावेश आहे. तर उर्वरित बहुतांश मध्यम वयोगटातील नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक अँटिबॉडीज तपासणीसाठी फारसे येत नाहीत.
--------------
ही डमी आहे.