विकास करण्यासाठी नाशिक घेतले दत्तक
By admin | Published: February 19, 2017 01:47 AM2017-02-19T01:47:39+5:302017-02-19T01:48:00+5:30
मुख्यमंत्री फडणवीस : नाशिकच्या सभेत घोषणा, राज-उद्धव यांच्यावर टीका
नाशिक : नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो, पाच वर्षांत या शहराचा विकास केला नाही तर पुन्हा तोंड दाखविणार नाही, असा शब्द देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता देण्याचे आवाहन केले. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत सोशल मीडियावर व्हायरल
होत असलेली बांधकाम नियंत्रण नियमावली ही बनावट असल्याचा उच्चार करताना खऱ्या नियमावलीत कोणताही नाशिककर बाहेर जाणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी गेले दोन दिवस नाशिकमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्ये खोडून काढत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजवर अनेकांनी नाशिकमध्ये येऊ थापा मारल्या, सत्ता दिल्यास असे करू तसे करू असे सांगितले, परंतु मी तसे करणार नाही, असे सांगून त्यांनी मी नागपूरचा असलो तरी त्यापेक्षा हे शहर दत्तक घेतो, मी नागपूरचा असलो तरी ते शहर सांभाळण्यासाठी नितीन गडकरी समर्थ आहे, असे ते म्हणाले.
बांधकाम नियमावलीमुळे नाशिक शहरवासी विस्थापित होणार नाही, मी मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री म्हणून सांगतो की, खऱ्या नियमावलीत सात मीटर किंवा अन्य कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या घरांच्या पुनर्वसनासाठी टीडीआर आणि एफएसआयची तरतूद करण्यात आली आहे. अडचणीचा ठरलेला कपाटाचा प्रश्नदेखील त्यात निकाली निघणार असून, अशा मिळकती नियमित करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे नियमावलीमुळे मूळ नाशिककरांना बाहेर जावे लागणार नाही तर असे सांगणाऱ्या मनसेलाच बाहेर जावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
शेतकरी प्रतिकूल परिस्थतीत आहेत, हे मान्य आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती योग्य वेळी मिळेलच असे सांगताना त्यांनी निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचा कळवळा आलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका सुरू असताना ग्रामीण भागात किती सभा घेतल्या, ज्या महापालिकांचे मोठे बजेट आहे, अशा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा मोजक्याच ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना २००९ मध्ये कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु त्यामुळे काय झाले, दुसऱ्याच वर्षी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्त्या झाल्या. त्यामुळे कर्जमाफीबरोबरच शेती विकासावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. नाशिकमधील कांदा उत्पादकांच्या समस्या मोठ्या आहेत आघाडी सरकार असताना सात वर्षांचा कांदा निर्यात बंदीचा करार करण्यात आला होता. परंतु भाजपा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून आपण केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन पत्र पाठविले आणि कांदा निर्यात करण्यास भाग पाडले, असेही ते म्हणाले. कांद्याला भाव मिळत नाही या समस्येबाबत आचारसंहिता संपता क्षणी राज्य सरकार तोडगा काढेल, असे ते म्हणाले.
मनसेने पाच वर्षांत नाशिकचा विकास केल्याच्या दाव्यावर बोलताना त्यांनी मनसेने इतकी कामे केली तर त्यांचे नगरसेवक अन्य पक्षांत का गेले, असा प्रश्न केला. राज्य सरकारने २२०० कोटी रुपये दिल्यानेच नाशिकचा विकास झाला, असा दावा केला. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे महापालिकेच्या वाटेचा खर्च सरकारनेच करावा, असे राज यांनी लेखीपत्र दिले होते. त्यामुळे हा खर्च शासनाने केला. राज ठाकरे ज्या बॉटनिकल उद्यानाचा उल्लेख करतात, ते आपणच महापालिकेकडे हस्तांतरित करून दिले. रतन टाटा यांनी त्याचा विकास केला. या कामाला रतन टाटा हवे असतील, तर मनपाने काय केले? असा प्रश्न त्यांनी केला. मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करून सत्ता मिळवणाऱ्या राज यांनी पालिकेत सत्ता आल्यानंतर भूमिपुत्रांना ‘टाटा’ केला, असेही ते म्हणाले. वनौषधी उद्यान विकसित करताना राज यांनी नाशिकमधील कुसुमाग्रजांच्या स्मारकाकडे का लक्ष दिले नाही, असा प्रश्न करीत मराठी अस्मिता जागवणाऱ्या कुसुमाग्रजांचे त्यांना विस्मरण झाले, असेही सांगिंतले. नाशिकचे विमानतळ तयार असून लवकरच विमानसेवाही सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. महींद्र अॅण्ड महींद्रश्ी बोलून आम्ही इगतपुरीला गुंतवणूक मिळवून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका करताना टिंगल टवाळ्या करणे हेच त्यांचे काम असल्याचे सांगितले. त्यांच्या भूलथापांमुळे इंजिनचे सर्व डबे बाजूला गेले, असेही ते म्हणाले. आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रास्ताविक केले. आमदार देवयानी फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी तसेच अन्य पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज ठाकरे यांना आता नकलाच कराव्या लागतील...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करून दाखविली होती, त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांना नक्कलच जमते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अशाच प्रकारे छगन भुजबळ यांची नक्कल करून सत्ता मिळविली होती आणि पाच वर्षे नक्कलच केली. आता या निवडणुकीनंतर त्यांना नक्कल करण्याचेच काम शिल्लक राहील, असा टोला फडणवीस यांनी लगावला. राज यांना हेच काम करावे लागणार असल्याने त्यांना गणेशोत्सवात नकला करण्यासाठी जरूर बोलवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे ही ‘लेना’ बॅँक...
भाजपाच्या बॅँकेत मतदान रूपी ठेवा आणि पाच वर्षांत विकासाचा सव्याज परतावा घ्या, असे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही बॅँका आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लेना बॅँक आहे, तेथे फक्त लेना आहेत, देना नाही, असे सांगताच हंशा पिकला. दुसरी राज ठाकरे यांची बॅँक असून, त्याचे हेड आॅफिस ‘कृष्णकुंज’आहे, त्यांची बाकी कुठेही शाखा नाही... तर राष्ट्रवादीची एक बॅँक आहे, परंतु सध्या ती बंद आहे, असे मिश्कील पद्धतीनेच त्यांनी सांगितले.
धाकधुक आणि हायसे...
पुणे येथे मुख्यमंत्र्यांची सभा गर्दीअभावी रद्द करावी लागली. त्यामुळे नाशिकच्या सभेकडे लक्ष होते. दुपारी साडेचार वाजेची सभा असल्याने रणरणत्या उन्हात सुरुवातीला जेमतेम लोक जमले होते. मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर साडेसहा वाजता सभास्थळी आले, तोपर्यंत गर्दी जमली होती. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना हायसे वाटले.