संरक्षणराज्यमंत्र्याचे दत्तक गाव आऊट आॅफ रेंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:28 PM2019-03-02T17:28:53+5:302019-03-02T17:31:27+5:30
साल्हेरची व्यथा : रेशनच्या धान्यासाठी डोंगरावर चढून घेतला जातो थंब
जोरण - बागलाण तालुक्यातील साल्हेर हे इतिहासकालीन व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. समृद्धी ग्राम योजनेंतर्गत विद्यमान खासदारांनी सदर गाव दत्तक घेतले आहे परंतु, संपर्कसाधनापासून हे गाव वंचित राहिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून मोबाईल टॉवरचा नुसता सांगाडाच उभा असून गाव आऊट आॅफ रेंज राहत असल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील साल्हेर, पायरपाडा, भिकारसोंडा,साळवण, महादर, छोटा महारदर, केळझर, तताणी, सावरपाडा, बारीपाडा, वग्रीपाडा, घुलमाल,भाटंबा आदि गावामध्ये बी.एस.एन.एलसह अन्य कंपनीची रेंज उपलब्ध होत नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील साल्हेर हे इतिहास कालीन व पर्यटन स्थळ असुन आदिवासी बहूल भाग आहे. या भागामध्ये पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून अनेक पर्यटक या भागामध्ये येत असतात. विद्यमान खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी समृध्द ग्राम योजनेअंतर्गत साल्हेर हे गाव दत्तक घेतले आहे. आठ महिन्यांपूर्वी भामरे यांच्या हस्ते मोबाईल टॉवरचे उद्घाटन करण्यात आले परंतु, त्यानंतरही रेंज उपलब्ध होऊ शकलेली नाही. याशिवाय, गेल्या १० वर्षापासुन परिसरात बीएसएनएलच्या टॉवरचा सांगाडा उभा आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्षच झालेले आहे. मोबाईल नेटवर्कची रेंजच उपलब्ध होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांची अडचण
इतिहास कालीन व पर्याटनस्थळ असलेल्या साल्हेर भागामध्ये १० वर्षापासुन मोबाईल नेटवर्कनाही. जिओ कंपनीमार्फत एक वर्षापूर्वी ओ.एफ सी केबल चे काम पुर्ण करण्यात आले परंतु अद्याप जिओ कंपनीचा टॉवर उभा राहिलेला नाही. बी.एस.एन.एलच्या ओएफसी केबल टाकण्यासाठी केबल उपलब्ध होत नाहीत. ग्रामस्थांना रेशन दुकानातील धान्य मिळवण्यासाठी रेशन दुकानदाराकडून अक्षरश: दोन तीन किलोमीटर डोंगरावर चढून जाऊन आधार थंब घेतला जात आहे. मोबाईलची रेंज शोधत,शोधत डोंगरावर जावे लागत आहे. शासनाच्या नियमानुसार थंब घेतल्याशिवाय धान्य देता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्याही अडचणीत भर पडत आहे.
जोडणी शक्य नाही
साल्हेर येथे बीएसएनएलच्या मालकीचा टॉवरचा सांगाडा युएसओ फंडातुन गेल्या १० वर्षापासुन उभारलेला आहे. साल्हेर येथे मोबाईल सेवा देण्यासाठी आम्ही प्रस्ताव महाप्रबंधक नाशिक यांच्याकडे पाठवला आहे. साल्हेर येथे मोबाईल यंत्रणा जोडण्यासाठी आवश्यक असलेले माध्यम जोडणी उपलब्ध होत नाही तसेच बिनातारी यंत्रणेसाठी भौगोलिक परिसर अनुकुल नसल्याने जोडणी शक्य होत नाही.
- एस.आर. पवार, मंडळ अभियंता, सटाणा बीएसएनएल