सर्वसाधारण महिलांच्या भांडणात आदिवासी महिलेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 09:20 PM2021-02-16T21:20:15+5:302021-02-17T00:26:47+5:30
मालेगाव: तालुक्यातील गुगूळवाड निघालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. या जागेसाठी सर्वसाधारण गटात निवडून आलेल्या दोन महिलामध्ये पदासाठी वाद झाल्याने पॅनलप्रमुख आर. डी. निकम यांचे मध्यस्थीने सरपंच पदावर आदिवासी महिलेस बसवून वाद मिटविण्यात आला. सर्वसाधारण जागेवर एसटी महिला सरपंच करण्याचा हा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरला.
गुगूळवाड येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या चुरशीच्या निवडणुकीत आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील गुगूळवाड विकास आघाडीने सातपैकी पाच जागा पटकावून निर्विवाद बहुमत मिळविले होते, निकम यांच्यासह सुपाबाई तलवारे, रोशनी निकम, सुनील निकम व निलम महाले हे पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले.
सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले. पॅनलमधून दोन सर्वसाधारण महिला व एक एसटी राखीव महिला निवडून आल्या होत्या. दोन्हीं सर्वसाधारण महिलांनी सरपंच पदावर दावा केल्याने पॅनलच्या नेत्यांसमोर बिकट प्रसंग निर्माण झाला होता. म्हणून पॅनलच्या प्रमुखांनी दोन्ही सर्वसाधारण महिलांना बाजूला करत सुपाबाई तलवारे या एसटी भिल्ल समाजाच्या महिलेला सरपंचपदाचा मान दिला. युवा सेनेचे प्रमुख सुनील निकम या तरुणास उपसरपंच पदाचा मान दिला, आर डी निकम यांनी उपसरपंच व्हावे म्हणून सर्वांनी गळ घातली होती,तथापि पॅनलची निर्मिती करतानाच उपसरपंच पदाचे नाव निश्चित झाल्याने निकम यांनी उपसरपंचपद घेण्यास नकार दिला. निकम परिवाराने सर्वांनी मिळून सर्वसाधारण महिलेची जागा असताना, एका एसटी महिलेस सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी वाल्मीक निकम, विजू निकम, भालचंद्र निकम, बापु बर्वे, विश्वास निकम, शांताराम निकम, शरद बर्वे, दिनेश बिब्बे,संतोष निकम, भाऊसाहेब निकम,प्रकाश निकम, आप्पा अहिरे, किशोर अहिरे, भूषण निकम, संकेत निकम आदीं उपस्थित होते.
नवनिर्वाचित सदस्यांचे गावभर औक्षण
दोन महिन्यापासून निवडणुकीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी गावात एकच जल्लोष केला, ढोल ताशा व गुलालाची उधळण करत, गावात जोरदार मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांचे महिलांनी गावभर औक्षण केले.सरपंच उपसरपंच पदासाठी दोनच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राहुल देवरे देवरे यांनी बिनविरोध निवडणूक झाल्याचे जाहीर केले, निवडणूक पार पाडण्यासाठी, ग्रामसेवक विजया सावळे, तलाठी श्रीमती साबळे ग्रामपंचायतचे कर्मचारी संजय सोनवणे, सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.