आता कोरोनामुक्त झालेल्यांना ॲन्टिबॉडीज चाचण्यांचे सल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:56+5:302021-05-15T04:14:56+5:30
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या आतच देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसी उपलब्ध झाल्या. त्यानंतर लसीकरण सुरू ...
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या आतच देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसी उपलब्ध झाल्या. त्यानंतर लसीकरण सुरू असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली आणि शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे मात्र लसीकरण सुरूच आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर साधारणत: ४५ दिवसांनी लसीकरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार कोरोनामुक्त झालेले लसही घेत आहे. मात्र, त्याबाबतदेखील समज-गैरसमज आहेत. काही नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला आता लस घेण्याची गरज काय, असा प्रश्न आहे. तर काही जण वैद्यकीय सल्ल्याने किंबहुना डॉक्टरांकडून सक्ती केली जात असल्याने प्रतिपिंड तयार झाले किंवा नाही याची म्हणजेच ॲन्टिबॉडीज तपासून मगच लस घेण्यास जात आहेत. त्यामुळे अकारण लस घेण्यासाठी दीड हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार मात्र अशाप्रकारच्या कोणत्याही ॲन्टिबॉडीज चाचण्यांची गरज नसून शासनाने निर्देशित केल्यानुसार लसींचे ठरावीक मुदतीत डोस घेणे आवश्यक आहे.
कोट..
कोरानामुक्त झालेले रुण हे सहा ते आठ आठवड्यांनंतर कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेऊ शकतो. त्यासाठी ॲन्टिबाॅडी टेस्ट करण्याची कोणतीही गरज नाही.
- डॉ. नारायण देवगावकर
कोट...
कोरोनाबाधितांनी बरे झाल्यानंतर ४५ दिवसांनी लस घेतली पाहिजे, या पलीकडे ॲन्टिबॉडीज टेस्ट करण्याचे शासनाचे कोणतेही निर्देश नसल्याने अकारण चाचण्या करण्याची गरज नाही.
- डॉ. मंगेश थेटे, माजी अध्यक्ष, आयएमए
कोट...
कोरोनामुक्त झाल्यानंतर ठरावीक म्हणजेच ४५ दिवसांनंतर कोरोना प्रतिबंधक लस घेतली पाहिजे, लस घेण्यापूर्वी ॲन्टिबॉडीज चाचण्या करण्याबाबत शासनाचे काेणतेही निर्देश नाही.
- डॉ. आवेश पलोड, कोविड सेल प्रमुख, महापालिका
इन्फो...
कोरोनामुक्त झाल्यानंतर आपल्या शरीरात कोरोना विषाणू प्रतिबंधक प्रतिपिंड तयार झाले आहेत की नाही याबाबत चाचणी करून बघण्याचे फॅड सध्या रूढ होत आहे. एका चाचणीसाठी दीड हजार रुपये आकारले जाातात. ज्यांना स्वेच्छेने चाचणी करायची त्यांना अडचण नाही, मात्र एकदा प्रतिपिंड झाल्यानंतर संकट टळते असे नाही.