बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:47 AM2019-08-10T00:47:04+5:302019-08-10T00:48:15+5:30
पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे.
नाशिक : पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. तालुकास्तरावर उपलब्ध बाधित कुटुंबीयांच्या यादीनुसार संबंधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित केले जाणार आहे.
गेल्या शनिवारपासून चार दिवस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये निफाडसह मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील सुमारे ६१९० कुटुंबे बाधित झाली आहेत. या तीनही तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत बाधीत कुटुंबीयांची संख्या सहा हजार इतकी असून, नाशिक तालुक्यात सर्वाधिक बाधित कुटुंबीय आढळले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची घरे पाण्यात असल्यामुळे अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार अद्यापही सावरले नसल्यामुळे त्यांच्या पोटापाण्यासाठी या कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत होती. या संदर्भातील नाशिक, निफाड आणि मालेगाव तहसीलदारांनी मागणी नोंदविली त्यानुसार पुरवठा विभागाने धान्याचा साठा मंजूर केलेला आहे. तालुका पातळीवरील यंत्रणेने केलेल्या पाहणीत नाशिक तालुक्यात पुराचे पाणी आणि अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ३,३७६ इतकी असून निफाडला २,७७४ आणि मालेगावात ४० इतकी बाधित कुटुंबीयांची संख्या आहे. या तीनही तालुक्यांतील ६,१९० कुटुंबीयांना ६१९ क्विंटल गहू आणि ६१९ क्विंटल मंजूर करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने या संदर्भातील धान्य उपलब्ध करून देताना नियमित धान्य वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या बाधित कुटुंबीयांच्या संख्येनुसार प्रतिकुटुंब दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. नाशिक तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा मोठा भाग हा शहराचा आहे, तर अन्य तालुक्यांमध्ये ग्रामीण भाग समाविष्ट आहे. नाशिक तालुक्यातील ३,३७६ बाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे ३३,७६० किलो गहू, तर ३३,७६० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. निफाडसाठी २७,७४० गहू तर २७,७४० किलो तांदूळ, तसेच मालेगावमधील बाधीत कुटुंबीयांना ४०० किलो गहू आणि ४०० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.
आणखी मागणी येण्याची शक्यता
बाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ दिला जाणार असून, सध्या तीन तालुक्यांतील बाधित कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पावसाची आणि पुराची एकूणच परिस्थिती पाहता कळवण, पेठ, बागलाण, सुरगाणा तालुक्यातूनदेखील मागणी होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तालुकास्तरीय गुदामातील शिल्लक धान्यातून बाधितांना कुटुंबीयांना धान्य दिले जाणार आहे.