आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता
By संदीप भालेराव | Published: August 7, 2023 09:17 PM2023-08-07T21:17:05+5:302023-08-07T21:17:13+5:30
प्रवेशाचा मार्ग मोकळा : पूर्तता नसल्याने रखडली होती प्रवेशप्रक्रिया
नाशिक : राज्यातील सात वैद्यकीयमहाविद्यालये आणि एका दंत महाविद्यालयाने अखेर त्रुटींची पूर्तता करण्याबाबतचे हमीपत्र दिल्याने या महाविद्यालयांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संलग्नता प्रदान केली असून त्यामुळे येथील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून ज्या महाविद्यालयांना आरेाग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता आहे अशा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मात्र राज्यातील सात वैद्यकीय महाविद्यालये आणि एका दंत महाविद्यालयाने निकषांची पूर्तताच केली नसल्याने त्यांना संलग्नता प्रदान करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तेथील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारीदेखील विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या.
अपुरी शिक्षकसंख्या असल्याने या महाविद्यालयाच्या संलग्नतेबद्दल त्रुटी निर्माण झाल्या होत्या. त्यांना याबाबत विद्यापीठाकडून यापूर्वीही कळविण्यात आलेले होते. मात्र तरीही त्यांनी पूर्तता केली नसल्याने त्यांच्या संस्थेतील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता महाविद्यालयांमार्फत प्रतिनिधींनी आवश्यक असणाऱ्या शिक्षकसंख्येच्या त्रुटी पूर्ततेबद्दल कार्यवाही केली जाईल अशा स्वरूपाचे हमीपत्र विद्यापीठाकडे सादर केले असल्याने या महाविद्यालयांना संलग्नता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला याबाबत विद्यापीठातर्फे महाविद्यालय व त्यांच्या प्रवेश क्षमतेबद्दल माहिती देण्यात आल्याचे कुलसचिव राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.
---ही आहेत महाविद्यालये ------
१) तेरना मेडिकल कॉलेज नवी मुंबई
२) सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज कुडाळ सिंधुदुर्ग
३) डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रायगड
४) डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती
५) महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा
६) वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर
७) जवाहर मेडिकल फाउंडेशन मेडिकल कॉलेज धुळे
८) तेरना डेंटल कॉलेज नवी मुंबई