आदिवासी खातेदारांची तासन्तास परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:27+5:302021-07-08T04:11:27+5:30
सुरगाणा : येथील बँक ऑफ बडोदा व महाराष्ट्र बँकेमध्ये दररोज येणाऱ्या आदिवासी जनतेला सकाळपासून तासन्तास रांगेत उभे राहावे ...
सुरगाणा : येथील बँक ऑफ बडोदा व महाराष्ट्र बँकेमध्ये दररोज येणाऱ्या आदिवासी जनतेला सकाळपासून तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुधारणा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत यांनी केली आहे.
येथील बँक ऑफ बडोदा आणि महाराष्ट्र बँकेत विविध कामांसाठी आदिवासी ग्राहक दररोज येतात. यामध्ये वृद्ध महिला पुरुषदेखील असतात. दररोज उशीर होत असल्याने रांगेत लवकर नंबर लागावा यासाठी अनेकजण सकाळी ९ ते १० वाजेपासूनच नंबर लावायला सुरुवात करतात. बँकेतील व्यवहार सुरू होईपर्यंत ही रांग हळूहळू मोठी होत जाऊन काही वेळेस तर कोर्टाच्या बोळीतून मागील गल्लीत पोहोचते. या रांगेत वृद्ध महिला पुरुष, विद्यार्थीदेखील असतात. नंबर येईपर्यंत या सर्वांनाच ताटकळत उभे राहावे लागते. यात वृद्धांसह सर्वांचीच परवड व गैरसोय होत असते. काहींना तर नंबर न लागल्याने परत जावे लागते आणि दुसऱ्या दिवशी परत यावे लागते. यामध्ये आर्थिक फटका व शारीरिक श्रम व वेळ वाया जातो. संबंधित यंत्रणेने यावर उपाययोजना करून आदिवासी जनतेची मोठ्या प्रमाणात होणारी परवड व गैरसोय तत्काळ दूर करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत यांनी नायब तहसीलदार सुरेश बकरे यांना दिले आहे. यावेळी यशोधन देशमुख, बाळा राऊत, भास्कर बिरारी, राजेंद्र गावीत, मधुकर चौरे, दिनेश चौधरी, रामदास केंगा, आनंदा झिरवाळ, शाहरूख पठाण आदी उपस्थित होते.
--------------------------
आदिवासी जनतेला मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने लोकांची बचत खाती किंवा केवायसी सुरू करताना कागदपत्र जमा करून महिनाभराचा कालावधी उलटून जातो. तरीही अकाउंट सुरू होत नाही. ज्यांनी केवायसी कागदपत्रे जमा केली आहेत त्यांची खाती तत्काळ सुरू करून बँकेबाहेरील रांगेत होणारी परवड थांबवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- चिंतामण गावीत, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
------------------------------
लसीसाठी नव्हे बँकेसाठी रांग : सुरगाणा येथील बडोदा बँकेसमोर सकाळपासून लागलेली रांग. रांगेमधून ये - जा करणारे नागरिक व दुचाकीधारक. (०७ सुरगाणा बँक)
070721\07nsk_13_07072021_13.jpg
०७ सुरगाणा बँक