घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोनाकाळात जार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:38+5:302021-05-03T04:10:38+5:30

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना रोजची वाढती रुग्णसंख्या व होणारे मृत्यू पाहून नागरिक ...

Affordable plain water at home, but no jars in Corona | घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोनाकाळात जार नको

घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोनाकाळात जार नको

Next

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना रोजची वाढती रुग्णसंख्या व होणारे मृत्यू पाहून नागरिक घबराटीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे तर नकोच, परंतु बाहेरची वस्तूही घरात आणणेही नको, असे म्हणून नागरिक सध्या जारचे पाणीसुद्धा घेण्यास घाबरत आहेत. गतवर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचे संकट आले होते. मात्र, त्यावेळेस नागरिकांनी कोरोनाची एवढी धास्ती घेतली नव्हती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र सर्वांनाच घाबरवून टाकले आहे. यंदाही मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना लाटेने जनजीवन ठप्प झाले आहे.

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. माणसे भीतीपोटी घराबाहेर पडत नाहीत. माणसे घरात जाण्यापूर्वी बाहेरच आंघोळ करत आहेत. अशावेळी बाहेरून आणलेली वस्तू स्वच्छ धुऊन मगच घरात घेतली जात आहे. हीच परिस्थिती उन्हाळ्यात वापरात येणाऱ्या जारच्या बाबतीतही दिसून येत आहे. जारचे पाणी पिणाऱ्या नागरिकांकडून आता घरातल्या पाण्याला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता घरासमोर आलेले जार कोणीही घरात घेत नाहीत. हे जार वितरित करणारे वाहन अनेक ठिकाणी फिरून येत असल्याने नागरिकांमध्ये या जारमधील पाण्याविषयी भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरचे पाणी बंद करून घरातलेच पाणी उकळून वापर सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील शुद्ध पाणी विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने याठिकाणी वितरित होणारे जारचे पाणीही आता बंद झाले आहे.

पाणीपुरवठा विभाग अनभिज्ञ

नाशिक शहरात जवळपास १३० ते १४० शुद्ध पाणी जार निर्मितीची केंद्र आहेत. परंतु, याविषयी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील केवळ ६० ते ७० टक्के केंद्रांची नोंदणी झालेली असून, सुमारे ३० ते ४० टक्के केंद्रांनी कोणतीही नोंदणी केलेली नाही.मात्र या केंद्रांविषयी पाणीपुरवठा विभाग अनभिज्ञ आहे. दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये शहरातील अनधिकृत प्रकल्पांवर कारवाई झाल्याने बहुतांश विक्रेत्यांनी त्यांच्या प्रकल्पांची नोंदणी केली आहे.

--

कोरोनाचा कहर पाहून बाहेरची कोणतीही वस्तू घरात आणताना भीती वाटते. त्यामुळेच पाण्याचे जारही आता घेणे बंद केले आहे. त्याऐवजी घरातील उकळलेले पाणीच पिण्यासाठी वापरत आहे. घरातले पाणीच आता जारपेक्षा सुरक्षित वाटते आहे.

- संजय पवार, ग्राहक

--

यापूर्वी जारचे पाणी विकत घेऊन पित होतो. मात्र, आता बाहेरून आलेल्या जारचे पाणी पिण्यास घरातले सर्वच नको म्हणत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळेच जारचे पाणी बंद केले आहे. कोरोनामुळे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे विकत पाणी घेऊन पिण्याचा खर्चही टाळण्याची कुटुंबाची भूमिका आहे.

- गणेश जाधव, ग्राहक

--

विवाह सोहळे, सामूहिक कार्यक्रम बंद झाल्याने जारच्या पाण्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यासोबतच अनेकांनी उत्पन्न घटल्याने खर्चात कपात करण्यासाठी जारचे पाणी बंद करून नळाचे पाणी गरम करून तेच पिण्यासाठी वापरण्याची भूमिका घेतल्याने आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून जार विक्रीच्या व्यवसायावर परिमाण झालेला आहे.

- सागर धुमणे, पाणी जार वितरक

--

२५ ते ३० प्रकल्प बंद

नाशिक महानगर पालिका क्षेत्रात जवळपास १३० ते १४० शुद्ध पाणी जार निर्मिती प्रकल्प आहेत. यातील सुमारे २५ ते ३० प्रकल्प व्यावसाय ठप्प झाल्यानं बद पडले आहेत, तर १५ ते २० व्यावसायिकांनी त्यांचे प्रकल्प विक्रीस काढून या व्यवसायातून काढता पाय घेतला आहे. मात्र, यात ठराविक कंपन्यांचा व्यवसाय सुरू असून त्यांच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकही कोणत्याही भीतीशिवाय जारचे पाणी विकत घेत आहेत.

--

६० टक्के

२०२१ मध्ये जारची मागणी घटली

--

ग्राफ-

मार्च २०१९ -मध्ये दररोज होणारी विक्री - १४,७५०

मार्च २०२० -मध्ये दररोज होणारी विक्री - ९५८०

मार्च २०२१ -मध्ये दररोज होणारी विक्री -५९००

Web Title: Affordable plain water at home, but no jars in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.