२८४ दिवसांच्या प्रवासानंतर ‘स्माइल टॉर्च’ नाशकात
By admin | Published: October 6, 2015 11:48 PM2015-10-06T23:48:33+5:302015-10-06T23:49:32+5:30
सात दिवस मुक्काम : आॅर्थोडॉन्टिक उपचारांच्या जनजागृतीसाठी उपक्रम
नाशिक : इंडियन आॅर्थोडॉन्टिक सोसायटीने पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल या संस्थेच्या वतीने आॅर्थोडोन्टिक उपचारांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी देशभरात ‘स्माइल टॉर्च’ (मशाल) फिरवण्याचा आगळा उपक्रम राबवला जात आहे. ही ‘स्माइल टॉर्च’ २८४ दिवसांचा प्रवास करून सोमवारी आॅर्थोडॉन्टिस्ट दिनानिमित्त नाशिकमध्ये दाखल झाली. पुढील सात दिवस या ‘स्माइल टॉर्च’चा शहरात मुक्काम राहणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक आॅर्थोडॉन्टिक स्टडी ग्रुपच्या वतीने आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मुंबई येथून गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी ही ‘स्माइल टॉर्च’ प्रवासाला निघाली. पुणे, औरंगाबाद, नागपूर, रायपूर, दिल्ली, कोलकाता अशा देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना भेटी देऊन ही मशाल सोमवारी नाशिकला दाखल झाली. या मशालीचे आगमन झाल्यानंतर त्या शहरात आॅर्थोडॉन्टिक उपचारांवर जनजागृती केली जाते. नाशिकमधील सात दिवसांच्या मुक्कामानंतर ही मशाल हिमाचल प्रदेशातील शिमला येथे रवाना केली जाणार आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या पन्नासाव्या राष्ट्रीय आॅर्थोडॉन्टिक परिषदेत ‘स्माइल टॉर्च’च्या प्रवासाची सांगता होईल.
दरम्यान, स्माइल टॉर्चच्या आगमनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.