४० तासांनंतर वैभव सोनवणेचा मृतदेह शोधण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:52 PM2018-08-21T12:52:45+5:302018-08-21T12:53:07+5:30
विरगाव : दसाणा येथील लघुमध्यम प्रकल्पात बुडालेल्या वैभव संजय सोनवणे (रा. दसाणा, १९) या तरु णाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर बाहेर काढण्यात अखेर यंत्रणेला यश आले.
विरगाव : दसाणा येथील लघुमध्यम प्रकल्पात बुडालेल्या वैभव संजय सोनवणे (रा. दसाणा, १९) या तरु णाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर बाहेर काढण्यात अखेर यंत्रणेला यश आले. मंगळवारी सकाळी बॅकवॉटर क्षेत्रात वैभवचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर तो पाणबुडी पथकाने बाहेर काढला. यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव हा अविवाहित असून तो परिवारातील एकुलता एक मुलगा होता. रविवारी (१९) दुपारी चार वाजेच्या सुमारास मित्रांसमवेत दसाणा प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेला वैभव सोनवणे हा तरु ण पाण्यात बुडल्यानंतर त्याच्या शोधासाठी गत दोन दिवसांपासून तालुका प्रशासनाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले होते. गाव परिसर तसेच तालुक्यातील लोहोणेर येथील नामांकित पोहणाऱ्यांना दसाणा प्रकल्पात उतरवूनही मृतदेह हाती लागत नसल्याने सोमवारी सायंकाळी अखेर नाशिक महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण पथकाला पाचारण करून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतरही देविदास चंद्रमोरे यांच्या नेतृत्वाखालील पाच कर्मचाºयांच्या पाणबुडी पथकाला मृतदेह शोधण्यात अपयश आल्यानंतर सोमवारी रात्री ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा शोधमोहिमेसाठी हे पथक धरण परिसरात गेले असता यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना आढळून आला. त्यास या पथकाने बाहेर काढून गत दोन दिवसांपासून चालू असलेली शोधमोहीम अखेर थांबविली. यानंतर वैद्यकीय विभागाकडून जागेवरच शवविच्छेदन केले जाऊन त्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.