४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘चौकीदार’चा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:41 AM2019-04-19T00:41:50+5:302019-04-19T00:42:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मै हॅूँ चौकीदार’चा नारा दिल्यानंतर सोशल मीडियापासून ते गावाच्या पारापर्यंत ‘चौकीदार’ या शब्दाने धुमाकूळ घातला आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मै हॅूँ चौकीदार’चा नारा दिल्यानंतर सोशल मीडियापासून ते गावाच्या पारापर्यंत ‘चौकीदार’ या शब्दाने धुमाकूळ घातला आहे. या शब्दाच्या निमित्ताने ४५ वर्षांपूर्वी म्हणजे १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्याम रल्हन दिग्दर्शित ‘चौकीदार’ या हिंदी चित्रपटालाही उजाळा मिळाला आहे. या चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेल्या ‘यह दुनिया नही जागीर किसी की...’ या गीताचीही धूम सुरू आहे. सोशल माध्यमावर ‘चौकीदार’ या चित्रपटाच्या पोस्टरबरोबरच ‘चोर’ संबंधित चित्रपटांचे पोस्टर्सही झळकत आहेत. त्यामुळे ४५ वर्षांनंतर ‘चौकीदार’चा बोलबाला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणमैदान आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. ‘मै हूँ चौकीदार’ विरुद्ध ‘चौकीदार चोर है’ असा सामना रंगला आहे. चौकीदार या शब्दाने देशभर धुमाकूळ घातलेला असतानाच अनेकांनी सोशल माध्यमावर ४५ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘चौकीदार’ या हिंदी चित्रपटाला उजाळा दिला आहे.
या चित्रपटात त्यावेळी मोहम्मद रफी यांनी ‘यह दुनिया नही जागीर किसी की, राजा हो या रंक, यहॉ तो सब चौकीदार, कुछ तो आकर चले गए, कुछ जाने को तय्यार, खबरदार.. खबरदार’ हे गायलेले गीत प्रचंड गाजले होते.
सदर चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी जयप्रकाश नारायण यांची काँग्रेसविरोधी क्रांती संपूर्ण देशभर पसरली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै हू चौकीदार’ असा नारा दिल्याने या गीताची धूम सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यावर अनेक मनोरंजक टिपण्याही पाहायला मिळत आहेत. त्यातून भाजप विरूद्ध कॉँग्रेस यांच्यात रंगलेल्या आरोपांचे प्रतिबिंब उमटत आहे.
श्याम रल्हन दिग्दर्शित १९७४ मध्ये ‘चौकीदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मदनमोहन संगीतकार असलेल्या चित्रपटात संजीवकुमार आणि भाजपचे खासदार व मंत्री राहिलेले अभिनेता विनोद खन्ना यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. या चित्रपटात योगीता बाली, जीवन, ओमप्रकाश, सुलोचना, जयश्री टी अशी दिग्गज मंडळी होती. अभिनेता ओमप्रकाश यांनी चौकीदारची भूमिका निभावली होती.
चौकीदार आणि चोर
सोशल माध्यमावर चौकीदार विरुद्ध चोर असा सामनाही रंगला आहे. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चौकीदार’चे पोस्टर झळकावतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘हम सब चोर है’, ‘चोरों का चोर’, ‘चोरी मेरा काम’, ‘चोर मचाये शोर’, ‘चोरी चोरी छुपके छुपके’ अशा चोर शब्द असलेल्या चित्रपटांचेही पोस्टर्स पोस्ट केले जात आहेत. चौकीदार हा मूळ उर्दू शब्द असून, चौक म्हणजे चौकी आणि दार म्हणजे रखवालदार या दोन शब्दांपासून तो बनलेला आहे.