तब्बल ५ महिन्यांनंतर कोरोनाबाधित पुन्हा ६०० पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:19+5:302021-02-26T04:21:19+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढीने आठवडाभरात भयावह वेग पकडला असून गुरुवारी (दि. २७) नवीन कोरोना रुग्णसंख्या ६०१ वर ...

After 5 months, the corona is over 600 again! | तब्बल ५ महिन्यांनंतर कोरोनाबाधित पुन्हा ६०० पार !

तब्बल ५ महिन्यांनंतर कोरोनाबाधित पुन्हा ६०० पार !

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढीने आठवडाभरात भयावह वेग पकडला असून गुरुवारी (दि. २७) नवीन कोरोना रुग्णसंख्या ६०१ वर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात म्हणजेच बरोबर ५ महिन्यांपूर्वी कोरोनाबाधित संख्येने तब्बल सहाशेचा आकडा पार केला असून आठवडाभरात ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरपासून जानेवारीअखेरपर्यंत तीन महिने सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा शंभर ते दोनशेदरम्यान कायम होता. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर अचानकपणे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीने वेग पकडला आहे. गत आठवड्यात दोनशे ते अडीचशेदरम्यान असलेली बाधित संख्या आठवड्याच्या प्रारंभी तीनशे ते चारशेवर आणि गुरुवारी थेट सहाशेपार पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन यंत्रणादेखील चक्रावून गेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारच्या दिवसभरात ६०१ ने भर पडली असून, २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात एक, मालेगाव मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या एक अशा ३ मृत्यूंमुळे एकूण मृतांची संख्या २०९५ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ४७८ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १६ हजार ९१४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २४६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.२४ आहे. त्यात नाशिक शहरात ९६.५४, नाशिक ग्रामीण ९६.१२, मालेगाव शहरात ९२.९७, तर जिल्हाबाह्य ९३.६० असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ३६ हजार ४५८ असून, त्यातील चार लाख १४ हजार १७३ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २१ हजार ४७८ रुग्ण बाधित आढळून आले असून, ८०७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

सप्टेंबरमध्ये होती हीच स्थिती

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळण्याचे प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होते. बाधितांचा आकडा ६०० पार पोहोचण्याची स्थिती यापूर्वी २० ते २८ सप्टेंबरदरम्यान होती. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने पुन्हा जिल्ह्यातील सर्वाधिक बाधितांच्या आकड्याकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र भविष्यातील धोक्याकडे दिशानिर्देश करणारे आहे.

Web Title: After 5 months, the corona is over 600 again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.