६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

By संकेत शुक्ला | Published: May 18, 2024 09:17 AM2024-05-18T09:17:34+5:302024-05-18T09:18:00+5:30

सायंकाळी ६ वाजेपर्यंतच प्रचार करण्याची मुभा, पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे.

After 64 days the campaign will stop this evening; Only two days to vote nashik lok sabha Election | ६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

संकेत शुक्ल
नाशिक : महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नाशिकसह राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये प्रचाराची आज सांगता होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ६४ दिवसांमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना त्यामुळे पुर्णविराम लाभणार आहे. देशभरातील पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा सायंकाळी ६ वाजता थांबणार असल्याने सर्वच उमेदवारांकडून शनिवारी (दि. १८) शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागाने तापलेल्या वातावरणाचा उदया होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाने सागता होणार आहे. काही पक्षांच्यावतीने रॅली काढली जाण्याची शक्यता असून त्यामुळेही जिल्ह्यातील वातावरण दुपारपर्यंत तापणार आहे. यंदा महायुती आणि महा आघाडी यांच्यात थेट लढत होत असल्याने देशपातळीवरच्या नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावत राजकीय वातावरण अधिक तापवले. नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारीच्या नावावर एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत येथे संदिग्धता पहावयास मिळाली. त्यातच कांद्यासारख्या प्रश्नाने नाशिकध्ये डोके वर काढल्याने त्याचाही परिणाम येथील प्रचारात दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासह मोठ्या नेत्यांनी नाशिकमधील सभांचे मैदान गाजवले.

जवळपास सर्वच सभा सूरळीत पार पडत असताना पिंपळगाव येथे पंतप्रधानांच्या सभेत एका कार्यकर्त्याने केलेला गोंधळ लक्षवेधी ठरला. नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची करण्यात आल्याने अनेक मोठ्या नेत्यांनी येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तळ ठोकला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर नाशिकचा तब्बल चार वेळा दौरा केला.
इन्फो...

साधु संतांचा पुढाकार चर्चेत

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथेही अनेक साधु महंत पिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील काहींनी माघार घेतली तर काही जण शेवटपर्यंत लढण्याच्या पावित्र्यात असल्याने नाशिक मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले होते.

ही आहेत बंधने...

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६ अन्वये सार्वजनिक सभा घेण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणूक आयोजित करता येत नाही, उपस्थित राहता येत नाही, सहभागी होता येत नाही किंवा संबोधित करता येत नाही. सिनेमॅटोग्राफ, टेलिव्हिजन किंवा इतर तत्सम उपकरणांद्वारे कोणत्याही निवडणुकीची बाब प्रदर्शित करता येत नाही. कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी असल्याने त्याचे उल्लंघन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.

Web Title: After 64 days the campaign will stop this evening; Only two days to vote nashik lok sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nashik-pcनाशिक