नव्वद दिवसानंतर कुणाची भरणार शंभरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:19 PM2018-05-07T15:19:00+5:302018-05-07T15:19:00+5:30

उरले दोन दिवस : पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

After 90 days, one will pay a hundred times? | नव्वद दिवसानंतर कुणाची भरणार शंभरी?

नव्वद दिवसानंतर कुणाची भरणार शंभरी?

Next
ठळक मुद्देआयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसात कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता.आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या ९ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असून त्यानंतर कुणावर कारवाईची कु-हाड कोसळते, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण

नाशिक - आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसात कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि.९) नव्वद दिवस पूर्ण होत असून त्यानंतर कुणाची शंभरी भरणार, याबाबत अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाईची टांगती तलवार असून सर्वांनीच धसका घेतला आहे.
तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे दि. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हाती घेतली होती. त्यावेळी, आयुक्तांनी पहिले तीन महिने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजात शिस्त लावण्याबरोबरच सुधारणा करण्याचा अल्टीमेटम दिला होता. नव्वद दिवसात कामकाजात सुधारणा न झाल्यास कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना घरी पाठविण्याचाही इशारा देण्यात आला होता. सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या तीन-चार दिवसात त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली होती शिवाय, दफ्तर व्यवस्थित ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान,गेल्या १ मे रोजी महाराष्ट व कामगार दिनानिमित्त राजीव गांधी भवनच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आयुक्तांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना बोलावून घेत त्यांना ९० दिवसांच्या अल्टीमेटचे स्मरण करुन दिले होते. यावेळी, आयुक्तांनी झाडाझडती घेत ९० दिवसात ज्यांचे कामकाजात सुधारणा झालेली नसेल, त्यांना घरी पाठविण्याचा इशारा दिला होता. आता आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या ९ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असून त्यानंतर कुणावर कारवाईची कु-हाड कोसळते, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आयुक्तांकडून धडक कारवाई केली जात असल्याने सा-याच अधिकारी व कर्मचा-यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे, गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याकडील दफ्तर अद्ययावत करण्याबरोबरच प्रलंबित फायलींचा निपटरा करण्यावर भर दिलेला आहे.
कर्मचा-यांचे प्रशिक्षण
महापालिकेत आस्थापना विषय हाताळणा-या १०० कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. दि. ११ ते १३ मे या कालावधीत ५० कर्मचारी तर दि. २५ ते २७ मे या कालावधीत ५० कर्मचारी यांचे निवासी प्रशिक्षण शिबिर नाशिकरोड येथील विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणारे हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणा-या कर्मचा-याच्या वेतनातून प्रशिक्षणाचा खर्च वसुल केला जाणार आहे.

Web Title: After 90 days, one will pay a hundred times?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.