१९ वर्षांनंतर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:39 AM2019-12-31T01:39:43+5:302019-12-31T01:40:31+5:30
राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता.
नाशिक : राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. त्यानंतर मात्र १९ वर्षे एकच मंत्रिपद जिल्ह्याला मिळाले. आता मात्र छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ दादा भुसे यांच्या समावेशामुळे दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
नाशिक जिल्ह्णाला ८० च्या दशकांपर्यंत राज्य मंत्रिमंडळात एकच कॅबिनेट मंत्रिपद सातत्याने दिले गेले. स्व. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या पाठोपाठ बळीराम हिरे व पुष्पाताई हिरे यांच्याकडे शिक्षण, आरोग्य, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली. त्यातून नाशिक जिल्ह्णाच्या विकासाला हातभार लागला. मात्र १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्रिपदांची मोठी लॉटरी लागली. डॉ. दौलतराव आहेर यांना राज्याचे आरोग्य हाताळण्याची संधी मिळाली तर सेनेचे बबनराव घोलप यांना समाजकल्यामंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. याच काळात ए. टी. पवार व तुकाराम दिघोळे यांना काही काळापर्यंत राज्यमंत्रिपदी नेमण्यात आले. याचदरम्यान प्रशांत हिरे यांनादेखील राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद नाशिक जिल्ह्णाला लाभले. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्णातून छगन भुजबळ यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद दहा वर्षे होते. त्यानंतर २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात ‘युती’चे आठ आमदार असूनही दादा भुसे यांना एकमेव राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मात्र अगोदर छगन भुजबळ व सोमवारी दादा भुसे यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर जिल्ह्णाच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. आता या दोघांकडे कोणती खाती सोपविली जातात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मात्र कोणतेही खाते मिळाले तरी, या दोघांचा जिल्ह्णाच्या विकासासाठी फायदाच होणार आहे.
राष्टवादीत नाराजीचा सूर
सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाशिक जिल्ह्याच्या व विशेषकरून राष्टÑवादीच्या कोट्यातून एखादे राज्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने सहा आमदार निवडून पाठविले असल्यामुळे नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर या दोघांपैकी एकाची राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, तर कॉँगे्रसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनाही राज्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. राष्टवादीच्या एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही. त्यामुळे राष्टवादीत नाराजीचा सूर आळवला जात आहे.