कारवाईच्या बडग्यानंतर बीएलओ लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:56 AM2020-01-17T01:56:54+5:302020-01-17T01:57:22+5:30

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने ...

 After the action, BLO began work | कारवाईच्या बडग्यानंतर बीएलओ लागले कामाला

कारवाईच्या बडग्यानंतर बीएलओ लागले कामाला

Next
ठळक मुद्देगती कमीच : १६ हजार मतदारांपर्यंत पोहचले कर्मचारी

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने निवडणूक शाखेने कारवाईचा इशारा देताच कामाला काही प्रमाणात गती प्राप्त झाली आहे. मात्र कळवण आणि निफाड तालुक्यामधील बीएलओंकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने जिल्ह्यातील पहिली कारवाई यापैकी एका तालुक्यातून होऊ शकते, अशी शक्यता निवडणूक यंत्रणेकडून वर्तविली जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत सुमारे ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बीएलओ गांभीर्याने काम करीत नसल्याने केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी करण्यात आल्याचे समोर आले होते. निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य होणार नसल्याने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. जे कर्मचारी गांभीर्याने कर्तव्य बजवणार नाहीत अशा बीएलओंवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिल्याने आता बीएलओ कामाला लागले आहेत. गुरुवार (दि.१६) पर्यंत १६ लाख ४ हजार २८८ मतदारांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे काम बीएलओंना करायचे आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत मतदारांपर्यंत पोहचून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक शाखेने अ‍ॅप निर्माण केलेले असून, मोबाइच्या साह्याने आॅनलाइन माहिती भरण्याचे काम करता येणार आहे. यामुळे कामाला गती येणे अपेक्षित होते. त्यानुसार काही प्रमाणात कामाला गती आली असली तरी अजूनही मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. अजूनही जवळपास ३० लाख मतदारांपर्यंत बीएलओंना पोहचावे लागणार आहे.
बीएलओंवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक शाखेने दिल्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागल्याने पडताळणीचा आकडा वाढला आहे. ज्या तालुक्यांमध्ये कामकाज कमी होते तेथेदेखील वाढ झालेली आहे. मात्र कळवण आणि निफाड तालुक्यांमध्ये अजूनही कामकाज समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे.
आठ मतदारसंघ रेड झोनमध्ये
जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत सुरू असलेल्या मतदार पडताळणी अभियानात आठ तालुक्यांमध्ये अजूनही अपेक्षित कामगिरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे हे आठ मतदारसंघ अजूनही रेड झोनमध्येच आहेत. देवळाली मतदारसंघात ३२.३७, मालेगाव बाह्य मतदारसंघात २८.४९, नांदगाव २५.९९, सिन्नर २४.४४, मालेगाव मध्य २२.१८, नाशिक पूर्व २२.०२, येवला २१.१७, तर कळवण २०.९९ टक्के इतकेच कामकाज झाले आहे.

Web Title:  After the action, BLO began work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.