अखेर पाटील यांच्यासह आंदोलकांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:05 AM2019-06-29T01:05:45+5:302019-06-29T01:06:12+5:30
बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून महापालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पद तडकाफडकी काढून घेतल्यानंतर लगेचच पोलीस बळाचा वापर करून सत्तारूढ भाजपाने आंदोलन चिरडले आहे.
नाशिक : बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून महापालिकेच्या सभागृहातच ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पद तडकाफडकी काढून घेतल्यानंतर लगेचच पोलीस बळाचा वापर करून सत्तारूढ भाजपाने आंदोलन चिरडले आहे. शुक्रवारी (दि.२८) राजीव गांधी भवनात प्रचंड पोलीस ताफा नेण्यात आला आणि पाटील यांना उचलून घेण्याची तयारी करण्यात आली. मात्र पोलिसांबरोबर जाण्यास ते तयार झाल्यानंतर त्यांना तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेता गजानन शेलार, मनसेचे माजी गटनेता सलीम शेख आणि भाजपा नगरसेवक रवींद्र धिवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी मठ मंदिर बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र ते बाजूला झाले. तथापि, येत्या निवडणुकीत भाजपाला नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महापालिकेतील भाजपातील पाटील यांच्या विरोधात नाराजी वाढीस लागली होती. पक्षाचे आदेश न जुमानता पाटील हे वेळोवेळी पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देतात अशाप्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात येत होत्या. त्यातच मंगळवारी (दि.२५) महासभेत त्यांनी धार्मिक स्थळांना नियमित करावे, महापालिकेच्या मिळकतींचे सील खुले करून त्यांना दहा रुपये चौरस मीटर दराने भाडे आकारावे, सेंट्रल किचन योजना रद्द करावी व बचत गटांकडेच काम ठेवावे तसेच सिडकोतील बांधकाम मंजुरीसाठी जुनेच नियम वापरावे अशा प्रकारच्या मागणीचे पत्र पाटील यांनी दिले होते. त्यावर अपेक्षित निर्णय झाला नसल्याचा त्यांचा दावा होता यामुळे त्यांनी महापौरांच्या पीठासनसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांना राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार आणि मनसेचे सलीम शेख तसेच भाजपा नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी साथ दिली. गेली तीन दिवस हे आंदोलन सुरू असले तरी बुधवारी (दि.२६) पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी गेल्या होत्या. सभागृह नेता पदावर असताना त्यांचे आंदोलन हटविल्यास पक्षाची अधिक नकारात्मक चर्चा होईल हे लक्षात घेऊन प्रथम गुरुवारी रात्री सभागृह नेतेपदी सतीश सोनवणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) दुपारी अपेक्षेनुसार बळाचा वापर करून आंदोलन संपविण्याची तयारी करण्यात आली.
शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखेचे अधिकारी व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व संजय सांगळे, उपनिरीक्षक लोंढे, नारखेडे, राठोड, बागुल तसेच अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी महिला पोलीस पथक तसेच विशेष पथक महापालिकेत आणले. या पथकाने सभागृहातील कार्यकर्ते आणि आंदोलक समर्थकांना बाहेर काढले. महापालिकेच्या वतीने नगरसचिवांनी दिलेले पत्र पाटील यांना देण्यात आले. त्यात सभागृहातील आंदोलन बेकायदेशीर असल्याचा उल्लेख होता. या पत्राचे वाचन केल्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांनी पाटील यांना आंदोलन समाप्त करा, असे दरडावले. पाटील यांनी त्यांची बाजू मांडली.
आम्ही चोर नाहीत, लोकप्रतिनिधी आहोत
पोलिसांनी सभागृहात शिरल्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांनी आंदोलकांना दरडावण्याची भाषा केली. तुमचे काय म्हणणे आहे ते पोलीस ठाण्यात येऊन सांगा, असे त्यांनी सांगितल्यानंतर पाटील संतापले, आम्ही चोर नाही, लोकप्रतिनिधी आहोत, त्याचा विचार करून बोला असे त्यांना समजावले. लोकांच्या प्रश्नांवर आम्ही अधिकृतरीत्या प्रश्न दिले आणि सभागृहात आंदोलन दिले. आंदोलनाचा त्रास होत होता, तर महापौरांनी सुरक्षारक्षकांना सांगून आम्हाला हटविले असते आणि पदही निलंबित केले असते, असे शेलार यांनी सांगितले. संपूर्ण बाजू मांडल्यानंतरही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहात हे मला सर्व माहिती आहे, असे पाटील यांनी पोलीस अधिकाºयांना ऐकवलेच, परंतु आमचे आंदोलन कायदेशीर होते तुम्हीच बेकायदेशीर काम करीत आहात, असा आरोपही त्यांनी केले.