अखेर सरस्वती पूजन झालेच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:31 AM2021-12-04T01:31:35+5:302021-12-04T01:33:20+5:30
उद्घाटनप्रसंगी पारंपरिक पद्धतीने सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन होणार किंवा नाही, याबाबत प्रारंभापासून आयोजकांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. अखेर शुक्रवारी उद्घाटनाच्या सोहळ्यात केवळ दीपप्रज्वलन आणि पालखीमध्ये ठेवलेल्या ग्रंथांचे पूजन करीत सरस्वती पूजनाला फाटा देण्यात आला. याबाबत महामंडळ योग्य ती भूमिका घेईल, असा इशारा देणारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सरस्वती पूजनाबाबत भाषणात कोणतीच भूमिका न घेता केवळ वैयक्तिक आरोपांबाबत खुलासे करण्यातच समाधान मानल्याने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक : उद्घाटनप्रसंगी पारंपरिक पद्धतीने सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन होणार किंवा नाही, याबाबत प्रारंभापासून आयोजकांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. अखेर शुक्रवारी उद्घाटनाच्या सोहळ्यात केवळ दीपप्रज्वलन आणि पालखीमध्ये ठेवलेल्या ग्रंथांचे पूजन करीत सरस्वती पूजनाला फाटा देण्यात आला. याबाबत महामंडळ योग्य ती भूमिका घेईल, असा इशारा देणारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सरस्वती पूजनाबाबत भाषणात कोणतीच भूमिका न घेता केवळ वैयक्तिक आरोपांबाबत खुलासे करण्यातच समाधान मानल्याने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने करण्याचे नियोजन सुरू होते. त्यामुळे संमेलनात सरस्वती पूजन टाळले जाण्याची शक्यता ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तात वर्तविण्यात आली होती. सारस्वतांचा मेळा असे संबोधल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने करण्याची आजवरची परंपरा होती. मात्र नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ऐनवेळी केवळ ग्रंथपूजन आणि दीपप्रज्वलन करुन थेट कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्याच्या साहित्य वर्तुळात उमटण्याची चिन्हे आहेत.