अखेर चव्हाण कन्येसह शिवसेनेत
By admin | Published: February 3, 2017 01:27 AM2017-02-03T01:27:30+5:302017-02-03T01:27:42+5:30
काही शिवसैनिक नाराज : शिवसेना कार्यालयात स्वीकारला ‘भगवा’
नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष व अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी गुरुवारी (दि.२) संध्याकाळी शिवसेनेमध्ये आपल्या कन्येसह प्रवेश केला. चव्हाण हे प्रभाग तीसमधून तर त्यांची कन्या प्रभाग तेरामधून इच्छुक आहे. यामुळे अन्य काही शिवसैनिक ांमध्ये नाराजी आहे.
आमदार अजय चौधरी हे काही दिवसांपूर्वी शहरात आले असता त्यांच्याकडे चव्हाण यांच्या प्रवेशाबाबत नाराजी बोलून दाखविली होती. यावेळी शिवसेना कार्यालयात गोंधळ निर्माण होऊन तिकीट कापाकापीचे नवे वादळ उठले होते. शहराची धुरा ज्यांच्याकडे आहे त्यांनी नाराज गटाची समजूतही काढण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता. अखेर चव्हाण यांनी काही मोठ्या नेत्यांचा हात धरून शिवसेनेचा उंबरा चढला. त्यामुळे आता प्रभाग तीस व तेरामधील काही शिवसेनेच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या गटामधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. पक्षप्रवेश होण्याअगोदरच चव्हाण यांनी दोन्ही प्रभागात प्रचारालाही सुरुवात केली होती. गुरुवारी शिवसेना कार्यालयात खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते आदि उपस्थित होते.
चव्हाण यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिवसेनेच्या इच्छुक कार्यकर्त्यांकडून बंडखोरी करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कारण प्रभाग तीसमध्ये जवळपास चारही जागांवर शिवसेनेकडून उमेदवारीचा दावा काही इच्छुक शिवसैनिक करत आहे. चव्हाण यांचा प्रवेश झाल्याने त्यांचा ‘पत्ता कट’ होण्याची चिन्हे आहे. यामुळे संबंधितांकडून बंडखोरी होऊ शकते. चव्हाण यांना प्रभाग तीस मधून तिकीट मिळाल्यास ‘त्या’ नाराज पॅनलमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.