तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:29 AM2019-10-02T01:29:01+5:302019-10-02T01:31:09+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर युती, आघाडीसह वंचित, मनसेने राजकीय गणिते जुळवली असली तरी अपेक्षित मतदारसंघ तसेच उमेदवारही न मिळाल्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त न करता ‘आता आमचंही ठरलंय !’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असताना त्याचे पडसाददेखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह नागपूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी दर्शविली असताना जिल्ह्यात अद्याप तशी परिस्थिती समोर आलेली नाही. मात्र अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागल्याने अशीच परिस्थिती कायम राहील याची शाश्वती आता तरी देता येणार नाही.
जिल्ह्यातून शिवसेना भाजपच्या कोणत्या जागांची अदलाबदली होते याकडे लक्ष असताना अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे तेथे निर्णय कोणताही झाला तरी पक्षाला अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागणार हे जवळपास निश्चितच आहे.
उघड नाराजीवर एकवेळ तोडगा काढणे शक्य असले तरी पक्षाच्या अनपेक्षित भूमिकेमुळे धक्का बसलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आता आमचंही ठरलंय’, असे म्हणत पक्षाला धडा शिकविण्याचे मनसुबे आखल्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांना दुर्लक्षून चालणार नाही.
आणखी काही नावांची घोषणा होणार असल्याने पक्षांतर्गत नाराजांमध्ये भर पडते की कार्यकर्त्यांचे समाधान होते यावर नाराजांचा आलेख कमी-अधिक होणार
आहे. नाराजी होणार हे गृहीत धरूनच निर्णय घेतले असण्याची शक्यता
आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नाराजांना शांत करण्यास पक्षाला यश आले तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते काय ठरवितात, हे पाहणे मतमोजणीतूनच समोर येणार आहे.
सर्वत्र नाराजी नाट्याला सुरुवात
राजकीय पटलावर सध्या उमेदवारांचीच चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यात सर्वत्र नाराजी नाट्यालादेखील सुरुवात झालेली आहे. अगदी हक्काच्या मतदारसंघांमध्येदेखील पक्षाला कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास या कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा उमेदवारांच्या नावांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांची आणि नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षांची धावपळ होणार आहे.