शिर्के यांच्यावरील हल्ल्यानंतर विहीप आक्रमक
By admin | Published: February 16, 2017 01:04 AM2017-02-16T01:04:00+5:302017-02-16T01:04:51+5:30
शिर्के यांच्यावरील हल्ल्यानंतर विहीप आक्रमक
नाशिक : गोहत्त्याबंदी कायद्याला दोन वर्षे पूर्ण होऊनही हवू तशी अंमलबजावणी केली जात नाही़ तसेच गोरक्षकांवरील हल्ल्यात वाढ झाली असून, मंगळवारी कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली़ या घटनेचा निषेध करून गोहत्त्येबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पावले उचलावीत अन्यथा विश्व हिंदू परिषदेतर्फे आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी बुधवारी (दि़१५) पत्रकार परिषदेत दिला़
गायकर यांनी सांगितले की, मालेगाव येथील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी गोहत्त्यासाठी जाणारा ट्रक अडवून ११ गोवंशाची सुटका केली़ तसेच ट्रकचालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला़ तर पोलिसांनी गोरक्षाचे काम करणाऱ्या शिर्केंवरच गुन्हा दाखल करून प्रमुख आरोपींना सोडून दिले़ पोलिसांची ही कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार आहे़
मालेगावमध्ये मोठा कत्तलखाना असून पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांवर गुन्हे दाखल करतात़ याचाच अर्थ असा होतो की गोहत्त्याबंदी कायद्याची अंमलबजावणी गोरक्षकच करीत आहेत़ पोलीस हातावर हात धरून बसले असून, कायदा हातात न घेण्याचा अजब सल्ला देत आहेत़ ठाणे, रावेर, संगमनेर, नाशिक या ठिकाणी गोरक्षकांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे़ गोरक्षक शिर्के यांना जबर मारहाण झालेली असतानाही त्यांनी शांतता ठेवण्याचा व्हिडीओ पाठविला आहे़ पोलिसांनी हल्लेखोर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही गायकर यांनी केली आहे़
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे, गोरक्षप्रमुख रमेश मानकर, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख अॅड. मीनल
भोसले यांसह कार्यकर्ते उपस्थित
होते़ (प्रतिनिधी)