सायकलीने पाठलाग करून नाशिकमध्ये वाळूचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:32 PM2018-04-30T14:32:00+5:302018-04-30T14:32:00+5:30
नाशिक : शहरात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करण्याचा प्रकार सुरूच असून, सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडने भरधाव वेगाने वाळू घेवून जाणारा मालट्रक प्रभारी प्रांत अधिकारी सोपना कासार यांनी सायकलीने पाठलाग करून पकडला. नंदुरबार जिल्ह्यातून सदरची वाळू नाशिक शहरात विक्रीसाठी आणली जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रांत कासार हे सायकलीने फिरण्यासाठी शहरात फेरफटका मारत असताना आठ वाजता त्र्यंबकरोडवरील मायको सर्कलवरून भरधाव वेगाने वाळूचा ट्रक (क्रमांक एम. एम. १५ डी. के. ६८०६) हा जात असल्याचे पाहून कासार यांनी ट्रकचा पाठलाग केला. पुढे हा ट्रक शरणपुर चौकीच्या वाहतूक सिग्नलवर थांबला असता कासार यांनी चालक देवेंद्र शेलार याला विचारणा केली असता, तो पर्यंत ट्रकचे मालक रामदास नाथा ठोंबरे व त्यांचे आणखी काही साथीदारांनी ट्रकभोवती गर्दी केली. कासार यांनी वाहतूक परवाना तपासला असता, पावतीची मुदत संपुष्टात आल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थितांनी कासार यांच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. परंतु कासार यांनी तात्काळ तलाठ्यांना पाचारण करून ट्रकचा पंचनामा करून तो ताब्यात घेतला. नंदुबार जिल्ह्यातील नंदारखेडा ता. शहादा येथून ही वाळू आणण्यात आली असून, शहरात अशा प्रकारे मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर तस्करीने वाळूचे शेकडो ट्रक बेकायदेशीरपणे आणले जात आहेत. यापुर्वीही कासार यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जातांना पाठलाग करून ट्रक पकडला होता.