पंचवटीत ड्रेनेज सफाईनंतर रस्त्यावर गाळ, माती पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:18 AM2019-04-01T01:18:21+5:302019-04-01T01:18:40+5:30
परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
पंचवटी : परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ड्रेनेज सफाई केल्यानंतर गाळ, माती उचलण्याची जबाबदारी ड्रेनेज विभागाची नसल्याचे सांगत टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पंचवटी परिसरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज विभागाकडून दैनंदिन रस्त्यालगतच्या गटारी साफ करण्याचे काम केले जाते. गटार साफ केल्यानंतर गटारातील गाळ व माती ढाप्यांच्या बाजूला ठेवली जाते, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागते. तीन ते चार दिवस गाळ व माती रस्त्यावर पडून राहत असल्याने संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर गाळ, माती उचलून नेण्याची जबाबदारी आमची नाही, दुसऱ्या विभागाची आहे असे सांगत टाळाटाळ केली जाते.
ड्रेनेज विभागाकडून ड्रेनेज साफसफाईचे काम केले जात असले तरी त्यामधून काढलेला गाळ, माती उचललाच जात नसल्याचे चित्र वारंवार दिसून येते. पंचवटी ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतरदेखील दखल घेतली जात नसल्याची ओरड खुद्द पालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केल्याने ड्रेनेज विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.