कोरोनानंतर कला, साहित्य पुन्हा बहरेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:12+5:302021-06-16T04:19:12+5:30
नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद ...
नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रमात नाशिकच्या कला, साहित्य क्षेत्राशी निगडित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर, सहायक सचिव शंकर बोऱ्हाडे, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, नाट्यलेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक सचिन शिंदे, चित्रपट महामंडळाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष शाम लोंढे, रवी जन्नावार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कोरोनामुळे साहित्य संमेलन लांबणीवर पडले असले तरी ते नक्की होणार असून कोरोना कमी झाल्यानंतर केवळ एक महिनाभराच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करून संमेलन आयोजित केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नाट्यक्षेत्राला अजून पुढील वर्षापर्यंत फटका कायम राहणार असल्याने अजूनही काळ माध्यमांना नाट्यक्षेत्राशी निगडित बाबींना सर्व माध्यमांना मदतीचा हात पुढे करावा लागणार आहे. मात्र, वर्ष-दीड वर्षांनंतर मराठी माणूस हळूहळू नाट्यक्षेत्राकडे पुन्हा निश्चितपणे वळेल, असा विश्वासदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला तर मालिका चित्रीकरणाच्या निमित्ताने कोरोना काळात नाशिकला अनेक नाट्यनिर्माते येऊन गेल्याने भविष्यात नाशिकमध्ये मालिका आणि चित्रपट चित्रीकरणांना अधिक वेग येईल. त्यामुळे नाशिकला चित्रपट चित्रीकरणासाठी कोरोना ही इष्टापत्ती ठरल्याचे मतदेखील व्यक्त करण्यात आले तर कोरोना काळात एकूणच समाजातील माणुसकी कमी झाली नसून ती काहीशी स्वजनांच्या सुरक्षेच्या पेचात अडकली आहे. मात्र, कला माध्यमांतून त्यातील विविध पदर उलगडले जातील, असा सूरदेखील यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. तत्पूर्वी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
इन्फो
अभिव्यक्ती होईल विविध माध्यमांतून
कोरोनाच्या काळात अभिव्यक्त होण्यासाठी केवळ समाजमाध्यमे उपलब्ध असल्याने त्यातूनच सर्व व्यक्ती, कलाकार अभिव्यक्त झाले. मात्र, नजिकच्या भविष्यात कोरोना विषयाला केंद्रस्थानी ठेवून नाटक, कादंबरी आल्यासदेखील आश्चर्य वाटू नये. महामारीमुळे कला काही काळ थबकू शकतात. मात्र, काही कालावधीच्या मंथनानंतर त्यातून निश्चितच नवनीत निर्माण होईल, असा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.