कोरोना मृत्युनंतर अनेकांच्या कुटुंबीयांनीही त्यांना नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:01+5:302021-05-01T04:14:01+5:30
नाशिक : कोरोनाबाधित नागरिकांच्या व्यथांना पारावार उरलेला नाही. कोरोना झाल्यानंतर रुग्णालय मिळण्यासाठीचा संघर्ष, कुणाला संघर्षानंतरही ऑक्सिजन बेड न मिळाल्याची ...
नाशिक : कोरोनाबाधित नागरिकांच्या व्यथांना पारावार उरलेला नाही. कोरोना झाल्यानंतर रुग्णालय मिळण्यासाठीचा संघर्ष, कुणाला संघर्षानंतरही ऑक्सिजन बेड न मिळाल्याची व्यथा तर कुठे बेड मिळूनही मृत्यू असे अनेकानेक प्रसंग दररोज घडत आहेत; मात्र काही नागरिक तर आपल्या कुटुंबीयांच्या मृतदेहालादेखील घेऊन जात नसल्याच्या घटना सातत्याने घडून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दरराेज किमान दोन-तीन अनोळखी किंवा नातेवाईक घेऊन न गेलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांवर येत आहे.
कोरोना झालेल्या नागरिकाला काही अपवादात्मक परिस्थितीत अत्यंत वाईट अनुभवांचा सामनादेखील करावा लागतो. काही नागरिक तर कुणाला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्याला फोन करायचेदेखील टाळतात. इतकी दहशत या कोरोनाच्या आजाराने निर्माण केली आहे. अशा प्रकारांमुळे कोरोना झालेल्या व्यक्ती आणि अन्य नातेवाइकांमध्ये नात्यातही दुरावा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी संबंधित बाधिताचे निधन झाले, तर विषयच संपतो; मात्र काही नागरिक तर बरे झाल्यानंतरही त्यांची विचारणा केली नाही, म्हणूनदेखील रुसवे फुगवे घडले आहेत. तर काही वेळा नागरिकांचा मृत्यू झाल्यावर तर कुटुंबीय तो मृतदेह ताब्यातदेखील घेत नाहीत. अशावेळी मग संबंधित व्यक्तीचा मृतदेह काही दिवस पडून राहिल्यानंतर मग त्याच्यावर मनपाच्यावतीने किंवा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांद्वारे अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
इन्फो
बिटकोसह जिल्हा रुग्णालयातही अनेक प्रकार
नाशिकरोडच्या बिटकोसह जिल्हा रुग्णालयातही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. नातेवाईक विचारणा करतील, यासाठी काही दिवस बॉडीदेखील शवागारात ठेवली; मात्र तरीही कुणीच न आल्यामुळे त्या मृतदेहांवर कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
इन्फो
काहींच्या नशिबी एकही नातेवाईक नाही
शासकीय निर्बंधांमुळे केवळ पाच नातेवाइकांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार केले जातात; मात्र काहींच्या नशिबी तर एकही नातेवाईकदेखील नसल्याची वेळ या कोरोनाने आणली आहे. काही रुग्णांना तर बेड मिळत नसल्याने नदीकिनारी कुठेही जागा मिळेल तिथे कंत्राटी कामगारांकडून अंत्यसंस्कार उरकले जातात.
कोट
अनेकदा नातेवाईक बरोबर नसतात, अनेकदा काही नातेवाईक मृताच्या जवळदेखील येत नाहीत. त्या परिस्थितीत आम्हालाच अंत्यसंस्कार करावे लागतात.
दिनेश कटारे, कंत्राटी कामगार.
------------------
(ही डमी आहे.)