पराभवानंतर ‘त्याने’ केले धान्यवाटप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 06:15 PM2019-07-19T18:15:00+5:302019-07-19T18:15:29+5:30
शेनवडमधील घटना : तहसीलदारांसह पोलिस ठाण्यात तक्रार
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रेशनधान्य दुकानदार असलेल्या पराभूत उमेदवाराने मतदारांनी आपल्याला पराभूत केल्याचा राग मनात ठेवत गावातील ग्रामस्थांना शासकिय धान्य देणेच बंद केले असून ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांच्याकडूनच आता यापुढे धान्य घ्या, असा दम भरल्याची तक्रार शेनवड येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय, सदर उमेदवाराकडून नवनिर्वाचित सदस्याला मारहाण केल्याचीही घटना घडल्याने घोटी पोलीस स्टेशनला तक्र ार देण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील शेनवड बु ॥ येथील रेशन दुकानदार गोरख गिळंदे हे ग्राहकांना योग्य वागणुक देत नसुन त्यांच्या चौकशीसाठी पुरवठा विभागात अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार पुरवठा अधिकारी चौकशी व जबाब घेऊन गेल्या नंतर गिळंदे यांनी नवनिर्वाचित सदस्य योगेश्वर गिळंदे यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केली शिवाय, मोटारसायकलचीही तोडफोड केली. या घटनेची माहिती घोटी पोलीस स्टेशनला तक्र ार देण्यात आली. त्यानंतरही गिळंदे यांनी पत्नीच्या छेडछाडीची खोटी तक्र ार दिली. दरम्यान घोटी पोलीस स्टेशनला ग्रामस्थांच्या मध्यस्थीने वाद मिटविताना गिळंदे यांनी रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी अधिकारी बोलावल्यामुळे तो राग मनात धरु न मारहाण केल्याचा खुलासा केला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य योगेश्वर गिळंदे, शिवाजी शिंदे, संजय गिळंदे, भोरु दिवटे, हरी गिळंदे, दुंदा वायाळ, महेश पोटे, वाघु गिळंदे, सुरेश शिंदे, मिलींद शिंदे, कुंडलीक गिळंदे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांवर उपासमारीची वेळ
ग्रामपंचायत निवडणुकाचा राग मनात ठेवत येथील ग्रामस्थांना शासकिय योजनेचे धान्य देत नसून धान्य दिल्याची पावतीही देत नसल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा धान्य दुकानदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करु .
- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी नेते.